पवई तलावस्वच्छतेची रखडपट्टी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे.

मुंबई - जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे.

मेट्रो रेल्वेच्या सहाव्या टप्प्याचा मार्ग पवई तलावाच्या परिसरातून जात असल्याने सुशोभीकरणाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. हे काम २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे यापूर्वी होत असलेली तलावाची नियमित सफाईही काही महिन्यांपासून बंद पडली आहे. महापालिकेने तलावातील कचरा आणि जलपर्णी काढण्यासाठी वर्षभरासाठी कंत्राटदार नेमला होता. त्याची मुदत काही महिन्यांपूर्वी संपल्यानंतर जलपर्णी काढणे बंद झाले. ‘सुशोभीकरणांतर्गत सर्व कामे करण्यात येणार असल्यामुळे अद्याप सफाईसाठी कंत्राटदार नेमलेला नाही, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

या तलवात मोठ्या प्रमाणात मगरी, तसेच इतर जलचर व काही पक्ष्यांचाही वावर असतो. मात्र, जलपर्णी व कचऱ्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्‍यात आला आहे. पालिका सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून या तलावाचे सुशोभीकरण करणार होती. त्यात खास ‘कोक्रोडाईल पार्क’ही बनवण्यात येणार होते. मात्र, आता सुशोभीकरण लांबणीवर पडल्याने हे पार्कही होणार नाही. मेट्रो रेल्वेचा हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत हे सुशोभीकरण होणार नसल्याने या मुक्‍या प्राणी-पक्ष्यांचा जीव धोक्‍यात आला आहे. मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे प्रमुख जल अभियंता ए. एस. तवाडिया यांनी सांगितले.

जलपर्णींचे अतिक्रमण 
या तलवात १७ वाहिन्यांमधून सर्रास मलजल व सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा खालावून तेथे जलपर्णींचे अतिक्रमण वाढले आहे. मुंबईतील पाणीपुरवठ्यासाठी २२० हेक्‍टरवर बांधलेला हा पहिला तलाव दूषित झाल्यामुळे औद्योगिक वापरासाठी हे पाणी वापरले जाते. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाणही वाढविण्यात येणार होते. मात्र, आता पुढील तीन वर्षे या तलावाला स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Powai Lake Cleanliness