कळवा दुर्घटनेनंतरचे भारनियमन रद्द मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वीजपुरवठा पूर्ववत

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रातील रोहित्र-1 मध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही परिसरात सुरू करण्यात आलेले भारनियमन रद्द करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता इतर पर्यायांद्वारे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती महापारेषणने दिली. 
 

मुंबई : महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रातील रोहित्र-1 मध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही परिसरात सुरू करण्यात आलेले भारनियमन रद्द करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजता इतर पर्यायांद्वारे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती महापारेषणने दिली. 

उरणमधील वीजनिर्मिती केंद्रात अतिरिक्त वायू उपलब्ध करून 100 मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात आली आहे. तसेच महापे एमआयडीसीचा वीजपुरवठा 400 केव्ही खारघरकडून पुरवण्याकरिता 220 केव्ही खारघर-बोरिवली वाहिनी क्रमांक 2 ही 220 केव्हीच्या महापे वाहिनीस जोडण्याचे काम शनिवारी पहाटे पूर्ण झाले. खारघर-बोरिवली वाहिनी क्रमांक 2 ची क्षमता वाढवण्याचे कामही शनिवारी दुपारी 12 वाजता पूर्ण करण्यात आले. या कामांमुळे महापे एमआयडीसीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे सद्यस्थितीत मुंबई, नवी मुंबई व ठाणे या भागांत भारनियमन रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महापारेषणतर्फे देण्यात आली. 

कळवा उपकेंद्रातील 400 केव्ही/200 केव्ही रोहित्र क्रमांक 1च्या 4 फेज युनिटचे ऑईल फिल्ट्रेशन पूर्ण करण्यात आले आहे. या रोहित्रांच्या जळालेल्या वाहिन्या बदलून नव्या वाहिन्यांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या रोहित्रांची आणि बदललेल्या वाहिन्यांची चाचणी झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरापर्यंत रोहित्र कार्यान्वित होईल, असा दावा महापारेषणने केला आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागांतील वीजपुरवठा रविवारीही सुरळीत राहील. त्यासाठी महापारेषण व महावितरणचे अधिकारी-कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. या कालावधीत ग्राहकांनी विजेचा जपून वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी केले आहे. 

अवघी रात्र जागली! 
महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण रात्र परिश्रम घेऊन विजेचा ताळमेळ राखण्यात यश मिळवले. त्यामुळे भांडुप नागरी परिमंडलाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. कळव्यातील दुर्घटनेमुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास काही कालावधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 

 

ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महापारेषणची 220 केव्ही खारघर-बोरिवली वाहिनी 220 केव्ही महापे वाहिनीस जोडण्यात आली आहे. तसेच महावितरणकडून विजेची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्याच्या आटोकाट प्रयत्नामुळे काही मोजकीच ठिकाणे वगळता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. 
- विश्‍वजित भोसले, 
जनसंपर्क अधिकारी, नागरी परिमंडल, भांडुप 

Web Title: power supply after the Kalwa crash, reinstate power supply in Mumbai, Thane, Navi Mumbai