बदलापूर येथे वीजपुरवठा पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

बदलापूर येथे पुरामध्ये नदीवरील विद्युत खांब तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले होते; मात्र महावितरणने प्रयत्न करून या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

कल्याण : अतिवृष्टी आणि महापुराने कोकण विभागात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. बदलापूर येथे पुरामध्ये नदीवरील विद्युत खांब तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले होते; मात्र महावितरणने प्रयत्न करून या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. जवळपास साडेसात लाख ग्राहकांना या काळात वीजपुरवठा विस्कळित झाला होता; मात्र त्यातील दहा हजार ग्राहक आज ही बाधित आहेत. 

उल्हास नदीवरील बदलापूर पुलावरील नदीतील खांब तसेच विद्युत वाहिन्यांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते. यामुळे या भागातील वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला होता; मात्र पुराचे पाणी ओसरल्यावर विभागाने परिश्रम करून विद्युत वाहिन्या तसेच खांब पूर्ववत केले. विभागाच्या कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण या परिसरातही वीज यंत्रणाबाधित झाली होती.

कोकण आणि नाशिक विभागातील बारा जिल्ह्यात विद्युत उपकरणांचे नुकसान झाले होते. पुरामुळे उच्चदाब वाहिन्यांचे खांब, लघुदाब वाहिन्यांचे खांबांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उच्च आणि लघु दाब वाहिन्याही क्षतीग्रस्त झालेल्या आहेत. काही परिसरात रोहित्र नादुरुस्त झाली आहेत; तर काही ठिकाणी ती कोसळली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power supply undone at Badlapur

टॅग्स