प्रज्ञासिंह यांच्या अडचणींत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

मालेगाव बाँबस्फोटात वापरलेली आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची मोटारसायकल सोमवारी (ता. ८) विशेष न्यायालयात आलेल्या साक्षीदाराने ओळखली.

मुंबई -  मालेगाव बाँबस्फोटात वापरलेली आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची मोटारसायकल सोमवारी (ता. ८) विशेष न्यायालयात आलेल्या साक्षीदाराने ओळखली. न्या. विनोद पडळकर यांनी न्यायालयाच्या आवारात जाऊन या मोटारसायकलची पाहणी केली. त्यामुळे प्रज्ञासिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मालेगाव बाँबस्फोटाच्या दिवशी हीच बाइक वापरण्यात आली होती, असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितले. न्यायालयाच्या आवारात एका टेम्पोत ही मोटारसायकल ठेवली आहे. न्या. पडळकर यांनीही टेम्पोत जाऊन या दुचाकीची पाहणी केली. पुरावे म्हणून या टेम्पोत काही सायकलीही ठेवण्यात आल्या आहेत. एलएमएल या कंपनीच्या मोटारसायकलवर ‘फ्रीडम’ असे लिहिलेले आहे. बाइकचा पुढील भाग ठीक असून, मागील भाग खराब झाला आहे. सायकलींची दुरवस्था झाली आहे.

मोबाईल टॉर्चचा वापर करून पाहणी करीत असताना न्या. पडळकर यांच्या कपड्यांवरही ग्रीसचे डाग पडल्याचे दिसले. या वेळी न्यायालयाच्या आवारात न्यायाधीशांसह कर्मचारी आणि वकील उपस्थित होते.

मालेगाव बाँबस्फोटात प्रज्ञासिंह यांची मोटारसायकल वापरल्याचा आरोप आहे. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावात झालेल्या बाँबस्फोटात सहा जण ठार आणि १०० हून अधिक गंभीर जखमी झाले होते. उच्च न्यायालयात आरोपी समीर कुलकर्णी व अन्य काही आरोपींनी दोषमुक्ततेसाठी याचिका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Singh Thakur problems increased