प्रकाश जाधव यांची कविता म्हणजे हृदयाची भाषा!

प्रकाश जाधव यांची कविता म्हणजे हृदयाची भाषा!

मुंबई -  प्रकाश जाधव यांनी आपले आयुष्यच कवितेतून मांडले आहे. प्रत्येक कविता परत वाचावी एवढी अद्‌भुत शक्ती त्यात आहे. हिटलर आई, बाप, भाऊ सगळे कुटुंब त्यांच्या कवितेत आले आहे. इतके सगळे भोगल्यानंतरही समाजातील दुर्बल घटकाला सोबत घेऊन ते चालत आहेत. आपल्या संस्थेमार्फत त्यांनी दुर्बलांना आवाज दिला आहे; पण त्यांच्या कवितेत मात्र कुठेही त्याविषयीची प्रौढी नाही. त्यांची कविता म्हणजे हृदयाची भाषा आहे, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ हिंदी लेखिका डॉ. सूर्यबाला यांनी एकता कल्चरल अकादमी आयोजित कवी प्रकाश जाधव यांच्या ‘मन के तलघर का प्रकाश’ या हिंदी कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात काढले.

जाधव यांच्या ‘मनाच्या तळघरातला प्रकाश’ या कवितासंग्रहाचा अनुवाद कवी रमेश यादव व अरविंद लेखराज यांनी केला आहे. हिंदी कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात झाले, त्यावेळी डॉ. सूर्यबाला बोलत होत्या. या वेळी प्रकाश जाधव यांच्या निवडक मूळ मराठी कविता व हिंदीत अनुवादित केलेल्या कवितांचे मान्यवर कवींनी वाचन केले. कवयित्री फरजाना डांगे यांनी हिंदी अनुवादित संग्रहाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. सुप्रसिद्ध साहित्यिक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाश जाधव यांची कविता सामाजिक चळवळीचे भान असलेली कविता आहे. कवी सामाजिक परिवर्तनाचा आघात घेऊन येतो, म्हणूनच क्रांती करू शकतो, असे गायकवाड म्हणाले. या कार्यक्रमात ‘एकताच्या पाऊलखुणा’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. कवयित्री अंजली कुलकर्णी यांना यंदाचा ‘एकता वाङ्‌मय पुरस्कार’ या वेळी देण्यात आला. कविता स्पर्धेचे पारितोषिक वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी अजय कांडर, सतीश सोळांकूरकर, विभू दत्ता राऊत, विजय साखळकर, लोककला अभ्यासक सदानंद राणे, दूरदर्शनचे निर्माते शरण बिराजदार, उपनिबंधक धनराज खरटमल, कवी रमेश यादव, कवी अरविंद लेखराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. अवधूत भिसे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com