तोंडी तलाकच्या प्रश्‍नात हिंदूंनी नाक खुपसू नये - प्रवीण तोगडिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

वसई - तोंडी तलाक हा मुस्लिम स्त्रियांचा प्रश्‍न आहे. ही त्यांची अंतर्गत बाब असून, त्यात हिंदूंनी नाक खुपसण्याची गरज नाही. आपण आपल्या माता-भगिनींचा संवेदनशीलपणे विचार करावा, असा टोला विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.

वसई - तोंडी तलाक हा मुस्लिम स्त्रियांचा प्रश्‍न आहे. ही त्यांची अंतर्गत बाब असून, त्यात हिंदूंनी नाक खुपसण्याची गरज नाही. आपण आपल्या माता-भगिनींचा संवेदनशीलपणे विचार करावा, असा टोला विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.

कोकण प्रांतातील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या शौर्य शिबिराचे तोगडिया यांच्या हस्ते वसईतील म. ग. परुळेकर विद्यालयात उद्‌घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. मिशनरी संस्था आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत असल्याचा दावा करीत असल्या, तरी विश्‍व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशस्तरावर या दोन्ही क्षेत्रांत भरीव काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दहा लाख रक्तदात्यांची ब्लड बॅंक, गरजूंना देशभरात खासगी रुग्णालयात उपचार देण्यासाठी केलेली सुविधा आदी मुद्द्यांची त्यांनी माहिती दिली. आपण समाज माध्यमाद्वारे पाच कोटी हिंदू समाजाशी सातत्याने जोडलेलो असतो, असेही डॉ. तोगडिया म्हणाले.

गोरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाकड गाईंचे गोशाळा हे स्थान असू शकत नसल्याचे स्पष्ट केले. दूध न देणाऱ्या गाईचे शेण व गोमूत्राचे अनेकविध लाभ असून, त्यापासून अत्यंत गुणकारी खतांची निर्मिती कशी करता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती या वेळी दिली. शेण व गोमूत्रापासून अनेक ठिकाणी सेंद्रिय खतनिर्मिती व अन्य उत्पादनांची उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जातात, तथा त्यातील आर्थिक उलाढालही आश्‍वासक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तसेच, गरिबीला कंटाळून धर्मांतर करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे ते म्हणाले.

370 वे कलम लवकरच रद्द
काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील 370 व्या कलमाबाबत भाष्य करताना डॉ. तोगडिया यांनी येत्या काळात ही तरतूद बंद केल्याचे दिसेल, असे मोघम उत्तर दिले. तसेच, पाकिस्तानवर सर्व बाजूंनी बंदी आणण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: pravin togdia talking