महिलांची ॲक्रेलिक रांगोळ्यांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

दिवाळीतला फराळ जसा रेडिमेड झाला तसेच आता रेडिमेड रांगोळ्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. फ्लॅट संस्कृतीत घरासमोर मिळणारी मर्यादित जागा लक्षात घेता बहुतांश महिला ॲक्रेलिक रांगोळ्या घेण्यास पसंती दर्शवत आहेत. विविध रंगी मिनाकारी, कुंदन, खडे, मोती, लेस, चमकीचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या लहान आकारातील ॲक्रेलिक रांगोळ्या १५० रुपयांपासून ते मोठ्या आकारातील २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

नवी मुंबई : दिवाळीतला फराळ जसा रेडिमेड झाला तसेच आता रेडिमेड रांगोळ्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. फ्लॅट संस्कृतीत घरासमोर मिळणारी मर्यादित जागा लक्षात घेता बहुतांश महिला ॲक्रेलिक रांगोळ्या घेण्यास पसंती दर्शवत आहेत. विविध रंगी मिनाकारी, कुंदन, खडे, मोती, लेस, चमकीचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या लहान आकारातील ॲक्रेलिक रांगोळ्या १५० रुपयांपासून ते मोठ्या आकारातील २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

पूर्वी अंगणामध्ये गेरूच्या सारवणावर दिमाखात सजणारी रांगोळी चाळीमध्ये प्रत्येकाच्या दारात मिळेल त्या जागेत आकार घेताना दिसायची. चाळीची जागा गृहसंकुलांनी घेतली आणि घरे जाऊन फ्लॅट संस्कृती आली. तसे घरासमोरच्या अंगणाची जागाही हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे ठिपक्‍यांच्या रांगोळीला ॲक्रेलीक रांगोळ्यांचा पर्याय समोर आला. रांगोळी काढता न येणाऱ्यांसाठीदेखील हा पर्याय उपयुक्त ठरू लागला. आकर्षक रंगसंगतीत तसेच हाताळण्यासही सुलभ असल्याने या रांगोळ्यांना महिलांची पसंती मिळत आहे. 

ॲक्रेलिकबरोबरच वूडन रांगोळी, वूडन स्टेन्सिल्सही बाजारात उपलब्ध आहेत. याबाबत विक्रेत्या जया कोकणे यांनी सांगितले की,  रेडीमेड रांगोळ्या दारासमोर, टीपॉयवर, कॉर्नर पीस म्हणूनही ठेवता येतात. शिवाय या रांगोळ्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्यास वर्षानुवर्षे वापरताही येतात. याव्यतिरिक्त नेहमीचे बाजारात प्लास्टिकचे लक्ष्मीच्या पावलांचे, स्वस्तिक, कुयरी व इतर रांगोळ्यांचा डिझाईन्सचे छापही पाहण्यास मिळतात. हे छाप ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. 

संस्कारभारती रांगोळीचीही क्रेझ
महिलांमध्ये संस्कारभारती रांगोळीची क्रेझ अजूनही कायम असून, रांगोळी शिकण्यासाठी महिलांची उत्सुकता दिसून येते. कमी जागेपासून मोठ्या आवारातही ही रांगोळी काढता येते. त्याकरता आवश्‍यक चाळणी, कागदी कोन किंवा फनेल, रांगोळीचा पेन अशा वस्तूही बाजारात पाहण्यास मिळत आहेत. हे पेन २० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच पेन, छाप, गालीचा पट्टा, रोलर, रंगीत पट्टा पेन अशा वस्तू असलेली किट २५० रुपयांपासून उपलब्ध आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prefer women’s acrylic rangoli