मेस्त्री सांगणार गिधाडांची महती

प्रेमसागर मेस्त्री
प्रेमसागर मेस्त्री

महाड (बातमीदार) : महाड येथील सीस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री यांची इंडोनेशिया (बाली) येथे ९ ते १६ आक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या अकराव्या जागतिक आशियाई शिकारी पक्षी संशोधन-संवर्धन परिषदेत ‘गिधाड’ या विषयावरील संशोधन प्रबंधासाठी निवड करण्यात आली आहे. 

जगातील ६० ते ७० देशांतून विविध शिकारी पक्षांच्या संवर्धनाविषयी काम करणारे पक्षितज्ज्ञ यात आपले प्रकल्प सादर करणार आहेत. अशा परिषदेत प्रबंध सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे भूषणावह मानले जाते. गेल्या तीन दशकांमध्ये अमेरिका, युरोप, रशिया येथील उत्तर गोलार्धातील प्रदेशांतून स्थलांतर करणाऱ्या शिकारी पक्ष्यांच्या संख्येत प्रचंड घट होत आहे. गरूड, गिधाड, ससाणे, घुबड, घार इत्यादी शिकारी पक्षांसोबत कुरलव, प्लोवर्स, सॅण्डपायपर्स, गल्स, टर्नस्‌ अशा अनेक समुद्रपक्षी पूर्वी लाखोंच्या संख्येने मुंबई ते सावंतवाडीच्या समुद्रकिनारी येत असत. आता मात्र यांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. या शिकारी पक्ष्यांमुळे पर्यावरण स्वच्छ राखण्याचे मोठे काम नैसर्गिक पद्धतीने केले जाते. शिवाय, अनेक घातक विषाणूंच्या रोगांचा नायनाट करण्यासाठी त्यांचे अस्तित्व मानवासाठी अत्यावश्‍यक आहे. परंतु, वाढती कचऱ्याची जागतिक समस्या, त्यामुळे निर्माण होणाऱ्या मासे व इतर जलचरांच्या प्रजनन क्षमतेच्या समस्या, कमी होत जाणारे अन्न आणि वातावरणातील वाढते तापमान अशा अनेक कारणांमुळे शिकारी पक्ष्यांची वीण धोक्‍यात येत आहे. या परिषदेत या सर्व विषयांवर सखोल अभ्यास व चिंतन केले जाणार असल्याचे मेस्त्री यांनी या वेळी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील या परिषदेमुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग निश्‍चित करणे, समजणे आणि संवर्धित करणे अशी अनेक महत्त्वाचे कामे युद्ध पातळीवर केली जातात. यामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय, आशियाई शिकारी पक्षी संशोधन, संवर्धन अभ्यास आणि प्रकल्प करार करणे सोपे जाते. यामुळे एकंदरीत या परिषदेच्या माध्यमातून अशा निसर्ग संवर्धन चळवळीला जागतिक महत्त्व प्राप्त होऊन प्रशासन व समाजावर त्याचा प्रभावीपणे चांगला परिणाम होतो. 

या कामासाठी लागणारी आर्थिक तरतूद, त्याचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या संशोधन केंद्राला या सर्व आशियाई देशांतून, तसेच जगभरातून वन्यजीव निधी उभा केला जातो. त्यालाच आशियाई शिकारी पक्षी संशोधन संवर्धन यंत्रणा (Asian Raptor Research Conservation Network) असे संबोधण्यात आले. याच जागतिक संस्थेची ही अकरावी परिषद इंडोनेशिया (बाली) येथे होत आहे. भारतातून गिधाडांविषयीच्या संशोधन प्रबंधाचे वाचन प्रेमसागर मेस्त्री हे करणार आहेत.

शिकारी पक्ष्यांवर लेख
रशियन रॅप्टर रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क या संस्थेकडून २०१८ ला आयोजित करण्यात आलेल्या सायंटिफीक ॲण्ड प्रॅक्‍टिकल परिषदेत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून येणाऱ्या समुद्रीगरूड या शिकारी पक्ष्याच्या संशोधनावर मेस्त्री यांनी लिहिलेला शास्त्रीय शोधप्रबंध नियतकालिकेत प्रकाशित झाला. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये आरआरसीएन या रशियन संस्थेच्या दुसऱ्या संशोधन शास्त्रीय नियतकालिकेत शिकारी पक्ष्यांवरील शास्त्रीय लेख प्रकाशित झाला. इंडोनेशियातील जागतिक परिषदेतही चिरगाव येथील गिधाड संवर्धन विषयावर शोधप्रबंध सादरीकरण व प्रकाशन होणार आहे, ही बाब रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद अशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com