घाऊक बाजारात तयार मसाले महागले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

तुर्भे एपीएमसी बाजारात या वर्षी मिरचीच्या किमती स्थिर आहेत; मात्र काही खडा मसाल्यांच्या वाढलेल्या किमतीबरोबरच वाहतूक, मजुरी आणि वेष्टनासाठीचा खर्च वाढला असल्याने तयार मसाल्यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली आहे.

ऐरोली - तुर्भे एपीएमसी बाजारात या वर्षी मिरचीच्या किमती स्थिर आहेत; मात्र काही खडा मसाल्यांच्या वाढलेल्या किमतीबरोबरच वाहतूक, मजुरी आणि वेष्टनासाठीचा खर्च वाढला असल्याने तयार मसाल्यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली आहे.

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच गृहिणींची मसाले तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. नवी मुंबईसह, उरण, पनवेल येथील गृहिणी त्यासाठी एपीएमसी मसाला बाजारात खडा मसाला आणि मिरची खरेदीला गर्दी करतात. 

एपीएमसीत मुख्यत्वे केरळ आणि अन्य राज्यातून खडा मसाल्याची आवक होते. सध्या कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून लाल मिरचीची आवक वाढली आहे. खडा मसाल्यात काळी मिरी, जायपत्री, काळी वेलची आणि हिरवी वेलची यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी काळी मिरी ५३० ते ७२० रुपये किलोने विकण्यात येत होती. ती या वर्षी ५६० ते ७६० रुपये प्रति किलो आहे. हिरवी वेलची १६०० ते १८०० रुपये प्रति किलो भावाने मिळत होती. ती या वर्षी १८०० ते २००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. जायपत्री २१०० रुपये प्रति किलो भावाने विकली जात होती; ती या वर्षी भाववाढ होऊन २,३६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मिरचीचे भाव स्थिर असले तरी मिरचीपूड आणि तयार मसाले ५ ते १० टक्‍क्‍यांनी महागले आहेत.

असे आहेत प्रकार 
आगरी मसाला, घाटी मसाला, मालवणी मसाला, मिरची पूड आदी.

या वर्षी काही मसाल्यांच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. मसाल्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची आवक चांगली आहे. विक्रीही चांगली आहे. 
- भोलानाथ ठक्कर, मसाल्याचे व्यापारी, एपीएमसी 

एप्रिलमध्ये ऊन चांगले असल्याने मिरची चांगली सुकली आहे. या महिन्यात तयार करून ठेवलेले मसाले वर्षभर टिकतात. किमतीत दरवर्षी किरकोळ वाढ होतच असते.
- सुनीता बावले, गृहिणी 

Web Title: The price of spices in the wholesale market increased by 5 to 10 percent