ऐन हंगामात बोंबलांचा भाव भडकला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

दर वर्षीपेक्षा १० टक्केही बोंबिल मिळाले नसल्याने त्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षी ते २० ते ३० रुपये किलोने मिळत होते. आता त्यांचा भाव तब्बल २५० ते ३०० रुपये आहे. 

मुंबई : बोंबिल म्हटला की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते; परंतु या वर्षी खवय्यांना या स्वादिष्ट माशाची चव चाखता आली नाही. दर वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर मुबलक मिळणारे मासे या वर्षी दुरापास्त झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दर वर्षीपेक्षा १० टक्केही बोंबिल मिळाले नसल्याने त्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षी ते २० ते ३० रुपये किलोने मिळत होते. आता त्यांचा भाव तब्बल २५० ते ३०० रुपये आहे. 

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर, श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्याबरोबर मुंबईच्या उथळ समुद्रात मोठ्या प्रमाणात बोंबील सापडतात. यंदा मात्र त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे, असे मच्छीमारांनी सांगितले. खलाशांचा पगार, डिझेल आणि इतर खर्चही निघत नसल्याने मासेमारी संकटात सापडली आहे. 
दिघी बंदराचे काम सुरू आहे. जहाजांची ये-जा सुरू आहे. त्याचा परिणाम बोंबिल मासेमारीवर झाला आहे. प्रदूषण, लांबलेला पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी १० टक्केसुद्धा बोंबिल मिळत नाहीत. 

गेल्या वर्षी हा मासा मुबलक प्रमाणात सापडत होता. त्यामुळे २० ते ३० रुपये किलो भाव होता. या वर्षी किलोला २०० ते ३०० रुपये भाव आहे, असे दिघी येथील मच्छीमार चंद्रकांत गुणाजी यांनी सांगितले. 

पाच बोटींचे मालक असलेले कुलाबा येथील हेमंत कोळी यांनीही काहीशी अशीच व्यथा मांडली. मागच्या वर्षी प्रत्येक बोटीवर ६०० ते ७०० किलो बोंबिल मिळत होते. ते या वर्षी ५० किलोसुद्धा मिळत नाहीत, असे सांगत मत्स्यदुष्काळाचे मुख्य कारण वाढते प्रदूषण असल्याचे त्‍यांनी सांगितले. 

या वर्षी पावसाळ्यात उथळ समुद्रात सापडणारे बोंबिल मासे मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. प्रदूषण व जागतिक हवामान बदल हे मुख्य कारण असू शकते. याचा फटका मच्छिमारांना बसला आहे.
- गणेश नाखवा, अध्यक्ष, ऑल इंडिया पर्ससीन नेट असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The prices of bombay duck flared up during the in season