'गटारी'वर आली पावसामुळे संक्रांत; कोंबड्यांच्या दरात प्रतिकिलो 20 रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबईत दररोज साधारणता 1500 टन कोंबड्या विकल्या जातात. रविवार असेल तर 1800 टन कोंबड्या मुंबईकर फस्त करतात. गटारीला हा आकडा दुपटीने वाढतो.

मुंबई : गटारीला कोंबड्यांवर ताव मारण्याचा बेत आखणाऱ्यांना चढ्या दराने कोंबडी विकत घ्यावी लागणार आहे. मुसळधार पाऊस त्यातच कोंबड्यांची मागणी वाढल्याने ऐन गटारीच्या तोंडावर कोंबड्यांचे दर किलोमागे 20 रूपयांनी वाढले आहेत.

मुंबईत दररोज साधारणता 1500 टन कोंबड्या विकल्या जातात. रविवार असेल तर 1800 टन कोंबड्या मुंबईकर फस्त करतात. गटारीला हा आकडा दुपटीने वाढतो. म्हणजे मुंबईत गटारीला 3600 टन कोंबड्या हातोहात खपतात. गटारीनिमित्त मुंबईत कोंबड्यांच्या 200 गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबईत एक किलो कोंबडीचा दर हा 110 रुपये इतका आहे. जिवंत कोंबडीचा दर किलोमागे 160 रुपये तर सोललेल्या कोंबडीचा दर हा किलोमागे 180 रुपये इतका आहे. तळेगाव, चाकण, शिरूर, शिक्रापूर, नाशिक, सासवड, नारायणगांव, संगमनेरहून मुंबईत कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात काही वाहन अडल्याने गाड्या मुंबईत पोहोचायला उशीर झाला आहे.

गटारीमुळे कोंबड्यांच्या मागणीत वाढ झाली असल्याने कोंबड्यांचे दर किलोमागे 20 रुपयांनी वाढले असल्याची माहिती सिद्धिविनायक पोल्ट्री ब्रिडिंग फार्म अँड हिचरिज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. अजय देशपांडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of chicken increased by Rs 20 per kg in Mumbai