तुरुंगात साजरे होतात कैद्यांचे वाढदिवस 

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई  - कैद्यांमधील नैराश्‍य दूर करण्यासाठी तुरुंग प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. वाढदिवशी फूल आणि चॉकलेट देऊन कैद्यांना शुभेच्छा देण्यात येतात. त्यासाठी कैद्यांच्या वाढदिवसांची यादीच तयार करण्यात आली आहे. आर्थर रोड तुरुंगात या उपक्रमाला सुरवात झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच असा उपक्रम तुरुंग प्रशासन राबवत आहे. 

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना भेटण्याचे नातेवाईक टाळतात, त्यामुळे कैद्यांना नैराश्‍य येते. त्यातून ते कधी कधी आत्महत्येचे पाऊलही उचलतात. हे टाळण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी अप्पर पोलिस महासंचालक (तुरुंग) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपक्रम हाती घेतले आहेत. आर्थर रोड तुरुंगात कैद्यांना गळाभेट, योग असे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी एका आरोपीचा वाढदिवस होता; मात्र त्या दिवशी त्याला भेटण्यासाठी कुणीच नातेवाईक न आल्याने तो रडत होता. तुरुंग अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी ते पाहिले. अहिरराव यांनी त्याची विचारपूस केली. किरकोळ चुकीमुळे तुरुंगात असल्याने कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करता येत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. त्यानंतर तुरुंग प्रशासनातर्फे त्याला फूल आणि चॉकलेट देऊन वाढदिवस साजरा केला. तेव्हापासून तुरुंगात कैद्यांचे वाढदिवस साजरे होऊ लागले. तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या जन्मतारखांची नोंद होते. महिन्यानुसार त्याची यादी तयार करून ती फळ्यावर लावली जाते. 

कैद्यांना प्रशासनाबाबत आपुलकी राहावी, या हेतूने वाढदिवस साजरे केले जात आहेत. वाढदिवसाची यादी फळ्यावर लावली जाते. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 
- हर्षद अहिरराव, अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह 
 
Web Title: Prisoner Birthday Celebrations