कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण ; ठाणे मध्यवर्ती तुरुंगात प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

ठाणे : ठाणे मध्यवर्ती तुरुंगात दोघा कैद्यांनी तोडफोड करून तुरुंग अधिकाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आशीष नायर आणि अभिनव तेजबहादूर सिंग अशी हल्लेखोर कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे : ठाणे मध्यवर्ती तुरुंगात दोघा कैद्यांनी तोडफोड करून तुरुंग अधिकाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. आशीष नायर आणि अभिनव तेजबहादूर सिंग अशी हल्लेखोर कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे तुरुंगात परतल्यावर पोटातील त्या कॅप्सूल उलटीद्वारे काढून देण्यासाठी नायर हा दबाव टाकत होता. यासाठी तो सहानी या कैद्याला मिठाचे पाणी आणि तंबाखूचे पाणी पाजून उलटी करण्यास सांगत असे; मात्र उलटी करूनही त्या कॅप्सूल बाहेर पडल्या नाहीत; मात्र वारंवार जबरदस्तीने तंबाखू व मिठाचे पाणी प्राशन करावयास लावल्याने सहानी याची प्रकृती ढासळू लागली. याबाबतची तक्रार सहानी याने तुरुंगातील वॉर्डन इरफान पठाण यांच्यासह तुरुंग अधिकाऱ्याकडे केली होती. या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी तुरुंग अधिकारी सतीश दिनकर माने, वरिष्ठ तुरुंग अधिकारी कानसकर व तुरुंग अधिकारी शिंदे यांनी नायर याला शनिवारी सकाळी चौकशीसाठी कार्यालयात बोलावून चौकशी सुरू केली. तेव्हा संतप्त झालेल्या नायर याने अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. 

या वेळी अभिनव तेजबहाद्दूर सिंग हा बाहेर उभा होता. तोही नायर याच्या मदतीसाठी धावत येऊन त्याने तुरुंग अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच तुरुंग अधिकाऱ्यांनी तत्काळ धोक्‍याची शिट्टी वाजवून सर्वांना सावध केले. त्यानंतर इतर पोलिस पथके मदतीला आली. नंतर नायर याला तुरुंगातील ग्रंथालयाच्या खोलीमध्ये नेले असता तेथेही आरोपी नायर याने धुमाकूळ घालीत ग्रंथालयाच्या खिडकीची काच फोडली व या काचेचा तुकडा हातात घेऊन तुरुंग अधिकाऱ्यांना मारण्यासाठी धावून आला; मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. 

कॅप्सूलसाठी उलटी 

काही दिवसांपूर्वी दिंडोशी न्यायालयात सुनावणीसाठी गेले असता नायर या कैद्याने सहकारी कैद्याला काही नशेच्या कॅप्सूल गिळायला लावल्या होत्या. तेथून ठाणे तुरुंगात परतल्यावर त्या कॅप्सूल उलटी करून पोटातून काढण्यासाठी नायर सतत दबाव टाकून सहकारी कैद्याचा शारीरिक छळ करीत असे. त्याबाबतच्या तक्रारी आल्याने चौकशीसाठी तुरुंग अधिकाऱ्यांनी बोलावल्याचा राग आल्याने त्याने हा हल्ला केला. याप्रकरणी नायरसह त्याचा साथीदार सिंग या कैद्यांविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Prisoners beat prison officials