कुंपनच खातंय शेत! खासगी रुग्णवाहिका चालवून सरकारची लूट; वाचा ही संतापजनक बातमी

नरेश जाधव
बुधवार, 29 एप्रिल 2020

  • शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त रुग्णवाहिका मुळे खाजगी रुग्णवाहिकांचा धंदा तेजीत;
  • शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची गरज

खर्डा : सगळीकडे कोरोनाने दहशत पसरवली असताना, शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात एकच रुग्ण वाहिका उपलब्ध असल्याने कोरोना संशयित रुग्णाची ने-आण करतांना शहापूरच्या आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. चार पैकी 3 रुग्ण वाहिका सद्या परिस्थितीत नादुरुस्त असल्याने येथील रुग्णांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खाजगी रुग्णवाहिकाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे येथील गोरगरीब रुग्णांसाठी शासनाने तात्काळ रुग्णवाहिकाची व्यवस्था करावी किंवा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर तालुक्यात नगरपंचायत हद्दीत एक 67 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला त्यानंतर कसारा येथे देखील एक मुंबई महानगरपालिकेची परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. अशा परिस्थिती शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या 4 रुग्णवाहिकांपैकी फक्त एकच रुग्णवाहिका कार्यन्वित असून 3 रुग्णवाहिका बंद आहेत, यामुळे येथील खाजगी रुग्णवाहिकांचा धंदा तेजीत आला असून विशेष म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयात जे शासकीय रुग्णवाहिका चालक आहेत, त्यांच्याच खाजगी रुग्णवाहिका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या रुग्णवाहिका ठाणे येथे जाण्यास 1500 रुपये तर मुंबईला जाण्यासाठी 3000 रुपये भाडे देतात. यामुळे खाजगी रुग्णवाहिकांची याठिकाणी मोठी रांग लागलेली दिसते, विशेष म्हणजे वर्षा काठी लाखो रुपये भाडे हे खाजगी रुग्णवाहिकाना शासन देते मग शासनाच्या स्वतःच्या मालकीच्या रुग्णवाहिका दुरुस्त का करत नाहीत हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे? याबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून गप का बसलेत हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

 

"उपजिल्हा रुग्णालयात 4 रुग्णवाहिका असून त्या पैकी 3 रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. त्या दूरुस्त करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे आणि एक रुग्णवाहिका गरोदर मातांना ने-आण करणे व औषधे आणण्यासाठी वापरली जाते, अशा वेळेस आम्ही खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेतो.

"डॉ.बनसोडे

(वैद्यकीय, अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय शहापूर)

 

"या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकांचे शासकीय चालक आहेत त्यांच्याच खाजगी रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे येथील रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त केल्या जात नाहीत, यामुळे हे चालक शासनाचा पगार घेतात तसेच आपल्या खाजगी रुग्णवाहिकेच भाडं देखील शासनाकडून घेतात यामध्ये शासनाची लूट होत आहे याबाबत अनेक तक्रारी करून ही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत"

बुवा अधिकारी

(रुग्णकल्याण समिती सदस्य व शिवसेना विभागप्रमुख शहापूर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private ambulance business booms due to faulty ambulance in Shahapur sub-district hospital