खासगी रुग्णसेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला. मंगळवारी सकाळी हे डॉक्‍टर कामावर रुजू होणार आहेत.

1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया
मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला. मंगळवारी सकाळी हे डॉक्‍टर कामावर रुजू होणार आहेत.

महापालिका आणि राज्य सरकारच्या शिकाऊ आणि निवासी डॉक्‍टरांनी आठवड्यापूर्वी काम बंद आंदोलन केले होते. त्या कालावधीत खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टरांनी काळ्या फिती लावून निषेध केला होता. मात्र, पश्‍चिम बंगाल सरकारकडून रविवारपर्यंत कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने सोमवारी खासगी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी काम बंद आंदोलन केले. शहरातील सुमारे 25 हजार डॉक्‍टर यात सहभागी झाली होते. तसेच, रेडिओलॉजी विभागाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत काम बंद केले. त्यामुळे क्ष-किरण, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. केवळ तातडीच्या रुग्णांच्या चाचण्या केल्या जात होत्या.

बाह्यरुग्ण विभाग बंद राहिले असले, तरी वॉर्डमधील रुग्णांची तपासणी केली जात होती. मात्र, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलून केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संपात ऍलोपेथी स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ डॉक्‍टरांच्या संघटनांनीही पाठिंबा दर्शविला, तर होमिओपथी आणि युनानी डॉक्‍टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. सार्वजनिक रुग्णालयांतील डॉक्‍टर आणि परिचारिकांनीही काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.

खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय "आयएमए'ने देशपातळीवर जाहीर करताच मुंबईतील नामांकित रुग्णालयांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला. वर्सोवा येथील धीरूबाई अंबानी रुग्णालयासह विलेपार्ले येथील नानावटी, फोर्टीस रुग्णालयाच्या शाखा, एशियन हार्ट, बॉम्बे हॉस्पिटल, अंधेरीतील होली स्पिरिट रुग्णालय आदी नामांकित रुग्णालयांतील बाह्यरुग्ण सेवा आणि रेडिओलोजी विभाग बंद ठेवण्यात आले होते. वॉर्ड आणि आपत्कालीन सेवेसाठी मात्र डॉक्‍टर हजर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Patient Service Stop by Doctor Strike