खासगी शिकवणी मालकाची हत्या करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

घाटकोपर येथील पंतनगर परिसरातील मयांक ट्युटोरियल्सचे मालक मयांक मंडोक (२७) यांची हत्या केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आरोपी गणेश पवार (२६) याला अटक केली आहे.

मुंबई ः घाटकोपर येथील पंतनगर परिसरातील मयांक ट्युटोरियल्सचे मालक मयांक मंडोक (२७) यांची हत्या केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आरोपी गणेश पवार (२६) याला अटक केली आहे.   

घाटकोपर पूर्वेकडील रायगड चौकातील शिवशक्ती हाईट्‌स या इमारतीच्या तळमजल्यावर मंडोक यांचा शिकवणी वर्ग भरतो. पवार हा मयांक यांच्या शिकवणी वर्गात कामाला होता. काही दिवसांपूर्वी मयांक यांनी त्याला कामावरून काढले होते. त्यानंतर पगारावरुन त्यांच्यात वाद होता. पवार रविवारी (ता. २२) सायंकाळी ६.३०च्या सुमारास मयांक यांच्या शिकवणी वर्गात गेला. त्यावेळी पगारावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर पवारने मयांक यांच्यावर चॉपरने हल्ला केला. मयांक यांनी केलेल्या प्रतिकारादरम्यान पवारही जखमी झाला. पोटात वार करण्यात आल्यामुळे मयांक खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, मंडोक यांची हत्या झाल्याने या शिकवणी वर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच विद्यार्थ्यांच्या शिकवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Teaching Owner murder, one person Arrested