खासगी 'तेजस'मुळे लाखो प्रवाशांचा जीव धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने हा आरोप केला आहे.

मुंबई : रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याची जबाबदारी इंडियन केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) आहे. काही दिवसांत रेल्वेच्या जेवणात कधी अळ्या सापडल्याच्या; तर कधी बुरशी लागलेला ब्रेड प्रवाशांना दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा संस्थेला तेजस एक्‍स्प्रेस चालवायला देणे म्हणजे लाखो प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे, असा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी मंगळवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत केला.

 

मुंबईकरांनो 'त्या' आनंदी दिवसांसाठी सज्ज व्हा

भारतीय रेल्वेची विक्री थांबवा; रेल्वे वाढल्यास देश वाढेल, अशी भूमिकाही या संघटनेने मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात मंगळवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने "रेल बचाओ' चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी रेल्वे वसाहती आणि जागांची विक्री, खासगीकरण आदी मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला. राकेश मोहन समितीची शिफारसींनुसार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुळांवर 80 टक्के भार नसावा. परंतु दिल्ली ते लखनऊ मार्गावरील तेजस एक्‍स्प्रेसमुळे इतर गाड्या थांबवण्यात येत असल्याने रुळांवर 180 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भार पडतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होतो, अशी भूमिका मांडण्यात आली. येत्या दोन दिवसांत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन खासगीकरण रोखण्याबाबत चर्चा करणार आहोत. त्यानंतर ठोस निर्णय न झाल्यास पुढील पावले उचलली जातील, असे रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी सांगितले. 

हेही वाचा : प्रवासाची घाई; पण बसच नाही

दुसरी खासगी तेजस एक्‍स्प्रेस 19 जानेवारीपासून अहमदाबाद ते मुंबई मार्गावर नियमित धावणार आहे. या खासगी गाडीत प्रवाशांना सवलती मिळणार नाहीत. तेजस एक्‍स्प्रेसच्या प्रवाशांना वेळेत पोहोचवण्यासाठी अनेक गाड्या लूप लाईनवर टाकण्यात येतील. त्यामुळे खासगी तेजस एक्‍स्प्रेससाठी लाखो प्रवाशांना फटका बसणार आहे. म्हणून सामान्य प्रवासी आणि रेल्वेचे मोठे नुकसान करणारे हे खासगीकरण थांबवणे गरजेचे आहे, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ. प्रवीण बाजपेयी म्हणाले. 

उशिरामुळे कोट्यवधींचे नुकसान 

खासगी रेल्वे गाड्यांना प्राधान्य दिल्यामुळे भारतीय रेल्वेच्या गाड्यांना विलंब होणार आहे. डिझेलवर धावणाऱ्या गाडीला एक तास उशीर झाल्यास 37 हजार रुपयांचा फटका बसतो. विजेवर धावणाऱ्या गाडीला एक तास उशीर झाल्यास 16 हजार रुपये नुकसान होते. भविष्यात 150 मार्गांवर खासगी रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, असा दावा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Tejas put lives in danger of millions of travelers