म्हणून... महाराष्ट्र अडचणीत! राजकारण थांबवा- सचिन सावंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

केंद्रातील मोदी सरकारने तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन प्रचंड बेफिकिरी दाखवली आणि त्याचे दुष्परिणाम इतर राज्यांबरोबर महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. तबलिगीचा वापर करून जातीयवाद पसरवण्याचे राजकारण भाजप नेत्यांनी करू नये, अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन प्रचंड बेफिकिरी दाखवली आणि त्याचे दुष्परिणाम इतर राज्यांबरोबर महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तबलिगी समाजाचा दिल्लीतील कार्यक्रम व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या भूमिकेसंदर्भात काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे भाजपने द्यावीत. तबलिगीचा वापर करून जातीयवाद पसरवण्याचे राजकारण भाजप नेत्यांनी करू नये, अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का? मद्यपी म्हणतात, दुधाची तहान ताकावर भागवू..!

सावंत म्हणाले, तबलिगी जमातने महाराष्ट्रातही संमेलन घेण्याबाबत परवानगी मागितली होती; परंतु संभाव्य संकटाची जाण ठेवून महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रचंड धोका टळला, परंतु दिल्लीत होणाऱ्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी तर दिलीच, परंतु त्याच दिवशी केंद्र सरकारने पत्रक काढून कोरोना व्हायरस ही आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणी नाही असा निर्वाळा दिला होता. तिथे किती लोक आहेत, कोण परदेशातून आले याची इत्थंभुत माहिती त्यांना होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तेथे गेले तेव्हा हे स्पष्ट होते, त्यामुळे ही बेफिकिरी जाणीवपूर्वक राजकारण करण्याकरता केली का? हा प्रश्‍न उपस्थित होतो. 

ही बातमी वाचली का? धारावी झोपडपट्टीला राजेश टोपे यांची भेट

ज्या पद्धतीने भाजपकडून कोरोनाचा विषय हा हिंदू-मुस्लिम अशा पद्धतीचे धृवीकरण करण्यासाठी केला जात आहे, त्यातून ही शंका अधिक गडद होते. महाराष्ट्रातील जनतेवरचा धोका अधिक वाढवण्याचे पाप हे केंद्र सरकारने केले आहे. संपूर्णपणे केंद्र सरकारचा दोष असताना किरीट सोमय्यांसारखे नेते राज्यपालांकडे जाऊन तबलिगी जमातबद्दलची माहिती मागतात, त्या वेळेस कोरोनाबरोबरच समाजात जातीयवादी व्हायरस पसरवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असे दिसते. अशा परिस्थितीत तरी जातीयवादाच्या हीन राजकारणाचा त्याग करावा, असे सावंत म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The problem of Maharashtra has increased due to the neglect of the central government- sachin sawant