आत्मविश्वासाने अडचणींना सामोरे जा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

वाशी सेक्‍टर- २६ येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित नवी मुंबई विद्यालय येथे बुधवारी (ता.२१) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सकाळतर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वक्ता म्हणून प्राध्यापक अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत, त्यांच्या शंकाचे निरसन केले.

नवी मुंबई : जीवनात कितीही अडचणींचा डोंगर असला, तरीही या अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जा, असा सल्ला प्रमुख वक्ते प्राध्यापक अविनाश कुलकर्णी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला. वाशी सेक्‍टर- २६ येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित नवी मुंबई विद्यालय येथे बुधवारी (ता.२१) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सकाळतर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वक्ता म्हणून प्राध्यापक अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत, त्यांच्या शंकाचे निरसन केले.

या वेळी अविनाश कुलकर्णी म्हणाले की, १४ ते १८ वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. त्यामुळे हा काळ खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये इयत्ता दहावीचा वर्ग हा पाया असून, त्यावर पुढील शिक्षणाची दिशा अवलंबून असते. त्यामुळे या वेळेत खूप मेहनत करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना नियोजन करणे आवश्‍यक आहे. तसेच पूर्णपणे आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यावर लक्ष केंद्रित करावे, असा कानमंत्रही त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला. पुस्तकांचे वाचन करताना केवळ डोळ्यांनी नाही; तर मनाने वाचन करणे आवश्‍यक आहे. समाधानासाठी अभ्यास न करता स्वतःसाठी अभ्यास करा. याशिवाय अभ्यास करताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणेदेखील आवश्‍यक असून, हलका व्यायाम करून पौष्टिक अन्न सेवन करावे, असा सल्लाही कुलकर्णी यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.

परकीय भाषा म्हणून इंग्रजीचा बाऊ न करता दिवसातील काळी वेळ या भाषेसाठी राखून ठेवावा. सोप्या ओळीचे लिखाण आणि वाचनाचा स्वतःहून सराव केल्यास कालांतराने इंग्रजीविषयी आवड निर्माण होईल. आत्मविश्वास दृढ झाला की बोलण्याचा प्रयत्नही आपोआप होईल. गणित विषयाबाबत बोलताना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, गणिताच्या एकाच समीकरणात तुम्हाला व तुमच्या शिक्षकांना ज्ञात असलेल्या सर्व पद्धती वापरून बघा. त्यामुळे गणिताचे प्रत्येक उदाहरण सोपे होऊन जाते. दहावीसारखे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असताना अभ्यासाविषयी धरसोड वृत्ती धोकादायक ठरते. मार्कांचे लक्ष्य प्रत्येक विद्यार्थ्याच्या नजरेसमोर असावे. या मार्गदर्शन शिबिरात अविनाश कुलकर्णी यांच्यासोबतच नवी मुंबई विद्यालयाचे संचालक संजय महाजन, मुख्याध्यापिका एस. पी. भोगले, छत्रपती विद्यालय वाशीचे मुख्याध्यापक एस. एच. पाटील, शिक्षक ए. एस. होगाडे, आर. एम. झिंजाड, पी. के. भोईर, जी. आर. गुरव, पालक प्रतिनिधी अशोक विघ्ने, सेवक एच. डी. भिंगारदिवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. खराटे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems Deal with confidence Kulkarni advises students