व्हेल माशाच्या सांगाड्यावर ऐरोलीत प्रक्रिया सुरू 

व्हेल माशाच्या सांगाड्यावर ऐरोलीत प्रक्रिया सुरू 

ऐरोली - येथील सागरी जैवविविधता केंद्रात ११ महिन्यांपूर्वी आणलेला मृत व्हेल माशाच्या सांगाड्यावर संरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी महिना उजाडण्याची शक्‍यता असून त्यानंतरच हा सांगाडा अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल, अशी शक्‍यता जैवविविधता केंद्राचे अधिकारी वर्तवीत आहेत.

११ महिन्यांपूर्वी उरण तालुक्‍यातील केगाव-माणकेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर ४५ ते ५० फूट लांबीचा मृत व्हेल मासा आढळला होता. या माशाचा सांगाडा वन विभागाने ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्राच्या आवारात आणून ठेवला. या वेळी सांगाड्याची झीज थांबवण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करून विद्यार्थी व अभ्यासकांना निरिक्षणासाठी ठेवण्याची वन विभागाची योजना होती. मात्र सांगाडा आणल्यानंतरही ऊन्हा-पावसात तो उघड्यावर असल्याने अखेर १९ जानेवारीला ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. सध्या या सांगाड्यावर बीएनएचएस या संस्थेद्वारे प्रक्रिया करण्यात येत असून सध्या हे काम प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती समोर येत असून ७ महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी शक्‍यता जैवविविधता केंद्राच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

जतन करण्याची  अशी असेल प्रक्रिया
मृत व्हेल माशाच्या सांगाड्याची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई सुरू आहे. त्यानंतर या सांगाड्याची पुनर्स्थापना करण्यात येणार असून काही हाडे कमी असल्यास ती गोंद व रासायनिक भुकटीच्या साह्याने बनवून हा सांगाडा पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या सांगाड्यावर वातावरणाचा परिणाम होऊन झीज होऊ नये, म्हणून काही रसायनांचा थर दिला जाणार आहे. त्यानंतरच हा सांगाडा प्रदर्शन केंद्रात १० ते १२ फुटांवर टांगून ठेवला जाणार आहे. यासाठी एक गॅलरीदेखील बांधली जाणार आहे. 

व्हेल माशाच्या सांगाड्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले असून प्रथम टप्प्यात शास्त्रीय पद्धतीने साफसफाई सुरू आहे. नंतर सांगाड्याची पुनर्स्थापना करून झीज होऊ नये म्हणून त्यावर रसायनांचा थर दिला जाणार आहे. 
- राहुल खोत, सहायक संचालक, बीएनएचएस

व्हेल माशांच्या सांगाड्यावर साफसफाई प्रक्रिया सुरू आहे. येत्या जानेवारी महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन सांगाडा अभ्यासकांना निरीक्षणासाठी प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.
- मयूर बोठे, परिक्षेत्र वनाधिकारी, सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com