अस्वच्छ वातावरणात मिठाईची निर्मिती 

दीपक घरत
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नागरिकांच्या आरोग्याला धोका; अधिकारी निवडणूक कामात व्यस्त

पनवेल : दिवाळीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते; मात्र पनवेल तालुक्‍यातील मिठाईच्या कारखान्यातील अस्‍वच्छता ‘सकाळ’च्या पाहणीत आली आहे. कारखान्यात वापरण्यात येणारे साहित्‍य, परिसरातील कचरा, त्‍यातच बनवली जाणारी मिठाई अशी धक्‍कादायक परिस्‍थिती समोर आल्‍याने सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

दिवाळी फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्‍ताने एकमेकांना गोड खाद्यपदार्थ भेट म्हणून देण्याची परंपरा पूर्वापार आहे. या दिवसात घरोघरी फराळ बनवून तो वाटण्याची रीत आहे; तर काही जण विकतची मिठाई घेऊन भेट म्हणून देणे पसंत करत असल्याने या दरम्यान विकतच्या मिठायांना मोठी मागणी आहे. 
मिठाई तयार करणाऱ्या कारखान्यांना अन्न आणि आणि औषध प्रशासनाकडून काही निर्बंध आखून देण्यात आले आहेत. पनवेल परिसरातील कळंबोली, कामोठे, खारघर; तसेच ग्रामीण भागात चालवण्यात येणाऱ्या कारखान्यांमध्ये मात्र हे निर्बंध झुगारून लावण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी घामाने थबथबलेल्या अंगाने कारागीर मिठाई तयार करण्याच्या कामाला जुंपले असल्याचे पाहायला मिळत असून, काही भागातील कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अशा वातावरणात तयार करण्यात आलेली मिठाई खाणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरण्याची शक्‍यता आहे.  

दुकानांकडे दुर्लक्ष
अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आले असल्याने ऐन सणासुदीच्या काळात मिठाई दुकाने आणि कारखान्यांकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता आहे. याचा फायदा उचलत अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाई विकली जाऊ शकते. 

कामोठे पोलिसांची कारवाई  
अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बहाणा करून कारवाईसाठी आलेल्या चौकडीविरोधात कामोठे पोलिसांनी रविवारी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये अलिबाग येथील आरोग्य विभागाच्या डॉक्‍टर आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असून, दुकानात गलिच्छ वातावरण असल्याचे कारण पुढे करून ही चौकडी दुकानदारांकडून पैसे आणि मिठाई वसूल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येथे करू शकता तक्रार 
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते. या काळात भेसळयुक्त वनस्पती तूप, खाद्यतेल, रवा, मैदा, बेसनासारख्या पदार्थांची विक्री होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अन्नपदार्थातील भेसळीबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या १८००२२२३६५ या क्रमांकावर 
संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production of sweets in unclean environment