प्राध्यापक भरतीसाठी राज्यमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्‍त असून, यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या रिक्‍त जागा तात्काळ भरण्यासाठी सरकारला योग्य ते निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. आपल्याच सरकारमधील एका मंत्र्याने राज्यपालांकडे अशी मागणी केल्याने सरकारमध्येच या प्रश्‍नाबाबत समन्वयाचा अभाव असल्याचे यातून दिसून येत आहे. प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे राज्यातील उच्च शिक्षण व संशोधनाचा स्तर म्हणावा तसा उंचावताना दिसून येत नाही. या जागा भरण्यासाठी सरकारकडून वेगाने पावले उचलण्यात येत नसल्याने प्राध्यापक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भरती सुरू करण्यासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली असतानाही सरकारकडून मात्र याची कोणतीही दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. दरवेळी अधिवेशनात विविध आमदारांकडून प्राध्यापकंच्या रिक्त जागांप्रश्‍नी प्रश्‍न उपस्थित करण्यात येतो; परंतु दरवेळी याचे नेमके उत्तर देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपण याप्रश्‍नी स्वतः लक्ष घालून प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनान योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती वायकर यांनी केली आहे.
Web Title: Professor Recruitment State Minister Governor