प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली, तसेच वितरित केलेली नवी मुंबई परिसरातील 80 हेक्‍टर जमीन गिळंकृत करण्यासाठी बिल्डर सक्रिय आहेत. नुकतेच उघडकीस आलेले खारघर येथील 1700 कोटी रुपये मूल्याचा भूखंड केवळ काही लाखांत विकत घेण्याचे प्रकरण हा या शृंखलेतील केवळ एक भाग आहे. सिडकोसारखे बडे विकास प्राधिकरण विशिष्ट जमीन मागत असताना त्याबद्दल निर्णय न घेण्याचा प्रकार बड्या हस्तक्षेपाशिवाय होऊ शकत नाही. सिडकोला भूखंड हस्तांतरित करण्याऐवजी तो परस्पर विक्रीस प्रोत्साहित करण्यामागे काही महत्त्वाच्या व्यक्तींची कार्यतत्परता दडली आहे.

खारघर येथे सिडको प्राधिकरणाने विकसित केलेल्या "सेंट्रल पार्क' या जागतिक दर्जाच्या मनोरंजन केंद्रालगत असलेली प्रकल्पग्रस्तांची जमीन पार्क 2 बांधण्यासाठी आवश्‍यक होती. नवी मुंबई परिसरात उभ्या राहणाऱ्या कॉर्पोरेट पार्क या नव्या प्रकल्पासाठी सुमारे 80 हेक्‍टर जमिनीवर व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍सपेक्षाही (बीकेसी) हा कॉर्पोरेट पार्क मोठा आणि महत्त्वाकांक्षी असेल. 65 एकरवर उभारल्या गेलेल्या बीकेसीत आता विस्ताराला जागा नाही. नवी मुंबई परिसर मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महानगरांना जवळ असल्याने भविष्यातला व्यावसायिक विकास या ठिकाणी होईल, अशी नियोजनकर्त्यांना खात्री आहे. प्रस्तावित विमानतळामुळे या पार्कचे व्यावसायिक मूल्य अधिकच वाढेल. कॉर्पोरेट पार्कसाठी आवश्‍यक असलेली 80 हेक्‍टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे.

मात्र, या संकुलाच्या सभोवताली दिसणाऱ्या व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी खासगी विकसक सक्रिय झाले आहेत. कोयना धरणातील प्रकल्पग्रस्तांना या भागात दिली गेलेली जमीन त्यामुळेच सोन्याचा भाव खेचते आहे. गरीब शेतकरी कुटुंबांना कित्येक वर्षाच्या परिश्रमानंतर, तसेच लालफितीशी झुंज देत मिळालेल्या सोन्याच्या तुकड्यावर बिल्डरांची नजर आहे. वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांना गेल्या काही वर्षांत वेगाने जमिनी मिळू लागल्या आहेत. मात्र, जमिनी मिळताच त्या विकत घेण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिक पद्धतशीर मोहीम राबवत असल्याचे उघडकीस आले आहे. सिडकोतील प्रामाणिक अधिकारी पॅरेडाइजने घेतलेला वादग्रस्त भूखंड सेंट्रल पार्क-2च्या विकासासाठी मिळावा, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, तीन वेळा त्यासंदर्भात पत्र देऊनही ही जमीन हस्तांतरित करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी अतिवरिष्ठांच्या आशीर्वादाने हे हस्तांतर दडपत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

आशीर्वाद कोणाचा?
पॅराडाइज बिल्डरला जमीन विकणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी काही दिवसांपासून शांत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधणारे काही मध्यस्थ एक लाख 84 हजारो प्रतिचौरस मीटर या दराने सिडको या परिसरातील जमीन खरेदी करत असताना केवळ 15 लाख रुपये प्रतिएकर भावाने खरेदी करीत आहेत. नवी मुंबईतील या टोळ्यांना आशीर्वाद कुणाचे? असा प्रश्‍न केला जातो आहे.

Web Title: project affected land builder