मुंबईकरांना व्यायामासाठी नवा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

येत्या उन्हाळी सुटीपर्यंत माहीममध्ये विस्तीर्ण पदपथ

मुंबई ः येत्या मार्च-एप्रिलपर्यंत माहीम समुद्रकिनाऱ्यावर विस्तीर्ण प्रोमनेड तयार होणार आहे. त्यामुळे गर्दीने गजबजलेल्या समुद्रकिनारी तरुणांना जॉगिंगसाठी, ज्येष्ठांना चालण्यासाठी, मुलांना सायकल चालवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुंदर असे हक्काचे ठिकाण निर्माण होईल. 

माहीमच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी एमएमआरडीएकडे प्रोमनेडसंदर्भात पाठवलेल्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याचे काम सुरू होईल व दोन ते तीन महिन्यांत ते पूर्ण होऊन नागरिकांना वापरासाठी खुला होईल. प्रोमनेड म्हणजे लांब-रुंद पदपथ असतो. जिथे वाहनांना परवानगी नसते; पण सायकलसाठी वेगळी मार्गिका असते. मुंबईतील मरिन ड्राईव्ह आणि वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरातील प्रोमनेडमुळे नागरिकांची चांगलीच सोय झाली आहे. त्याच धर्तीवर माहीमचा प्रोमनेड असेल.   

तिथे योगाभ्यास किंवा व्यायाम करण्यासाठी काही जागा असतील. ओपन जिमप्रमाणेच छोटे ॲम्फीथिएटरही असेल. मोठ्या प्रमाणात बाकडीही टाकण्यात येतील. त्यामुळे ज्येष्ठांना हास्य क्‍लबसाठी किंवा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा मिळेल. याच्या बांधकामासाठी साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती शीतल देसाई यांनी दिली. 

दोन किमी लांब
दादर-माहीम परिसरातील नागरिकांना व्यायामासाठी शिवाजी पार्क किंवा दादर चौपाटी असे दोनच पर्याय आहेत. मात्र, माहीमच्या नागरिकांना आता तेवढेही लांब न जाता जवळच्या जवळ प्रोमनेडचा पर्याय उपलब्ध होईल. माहीम किल्ल्यापासून प्रोमनेड सुरू होईल. तो किल्ल्याच्या दक्षिणेला सुमारे दोन किलोमीटर एवढा लांब असेल. माहीम समुद्रकिनारा सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पानुसार प्रोमनेड बांधला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promenade construction in mahim