ठाण्यात मोबाईल ॲपद्वारे प्रचार

रश्‍मी पाटील
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

भावी नगरसेवक  नागरिकांच्या खिशात येतील, अशा पद्धतीने विकसित केलेले ॲप यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण सांगत आहे...

ठाणे - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करून मतदारांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवल्या जात आहेत. मुख्यत्वे नवोदित उमेदवार मतदारांना व विशेष करून नवोदित व तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हायटेक प्रचार करत आहेत.

या हायटेक प्रचारात उमेदवार वैयक्तिक मोबाईल ॲपचा फंडा वापरत आहेत. निवडून आल्यावर नगरसेवक म्हणून उपयोगी पडणाऱ्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असा हा ॲप आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नवे खेळाडू जिंकण्यासाठीच उतरत असल्याचे स्पष्ट होत आहे.  

उमेदवारांनी आपले मोबाईल ॲप तयार करून प्रभागात त्याचा प्रचार, प्रसार करायला सुरुवात केली आहे. या ॲपमध्ये सुरुवातीला नागरिकांना मोबाईल क्रमांकाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार असले, तरी यामुळे भावी नगरसेवक तुमच्या खिशात, असे चित्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. मतदारसंघ, त्याने केलेली आंदोलने, विकासकामे यांची जंत्री यात रंगवण्यात आली आहे. वृत्तपत्रातील बातम्यांचा एक कप्पा आहे. शहरातील महत्त्वाच्या लिंक व संपर्क क्रमांक व प्रबोधनात्मक सूचना यामध्ये आहेत. उमेदवारांचे जाहीरनामे, आवाहने, संदेश यांचा विभाग असून विरोधकांच्या घोटाळ्यांसाठी विशेष जागा राखून ठेवण्यात आली आहे. व्हिडीओ क्‍लिप्स व छायाचित्रांची गॅलरी यामध्ये आहे. नागरिकांच्या सूचना व तक्रारी घेण्यासाठी एक विशेष दालन या ॲपमध्ये प्रथमदर्शनी आहे. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून उमेदवार घराघरात प्रत्येकाच्या हाती फ्लॅश होणार आहेत.

Web Title: Promotions by Mobile App