ऐरोली बेलापूरात प्रचाराची चढाओढ

शहरात प्रचारासाठी सर्वपक्षीयांकडून बाईक फेऱ्या काढल्या जात आहेत
शहरात प्रचारासाठी सर्वपक्षीयांकडून बाईक फेऱ्या काढल्या जात आहेत

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरल्यामुळे ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात राजकीय पक्षांमध्ये प्रचारावरून जोरदार चढाओढ सुरू असल्याचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. भाजप-महायुतीतर्फे ऐरोली मतदारसंघात उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूच्या उमेदवार मंदा म्हात्रे हे दोघेही विविध ठिकाणी रॅली, नाका सभांवर भर देत आहेत; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे हे मतदारांना प्रत्यक्ष गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. महायुती आणि आघाडीच्या तुलनेत काहीशा पिछाडीवर पडलेल्या मनसेने शनिवारी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे नेरूळमध्ये आयोजन केले आहे.
  
२१ ऑक्‍टोबरला सोमवारी विधानसभेकरीता मतदान होणार असल्याने शनिवारी, १९ ऑक्‍टोबरला सर्व राजकीय पक्षांना प्रचार बंद करावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडे प्रचाराकरीता दोन दिवसच मिळणार आहेत. या दोन दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे. कमी वेळेत मतदारांना गाठण्यासाठी भाजप महायुतीकडून मोटरसायकल फेरीवर भर दिला जात आहे. गुरुवारी (ता.१७) मंदा म्हात्रे यांनी वाशी गाव व शहरात मोटारसायकल फेरीचे आयोजन केले होते. तसेच सकाळी त्यांनी माथाडी कामगार व व्यापाऱ्यांची भेट घेतली. 

शुक्रवारी म्हात्रेंच्या प्रचाराप्रीत्यर्थ तुर्भे स्टोअरमध्ये भव्य मोटरसायकल फेरीचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आयोजन केले आहे. शनिवारी नेरूळ पूर्व ते तुर्भे गाव आणि शहर अशा मार्गावर मोटरसायकल फेरी काढून मतदारांना आवाहन केले जाणार आहे. ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक यांनीही कोपरी व घणसोली भागातील सिडको वसाहतींमध्ये पायी फेरीचे आयोजन केले होते. भाजपच्या दोन्ही बलाढ्य उमेदवारांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचे प्रचार पिछाडीवर पडले आहेत. 

मतदारांची अर्थपूर्ण मोजणी
मतदानाच्या आधीच्या रात्री लक्ष्मीची पावले उमटण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदारांच्या दारोदारी फिरून लक्ष्मी दिल्यानंतरही मताची खात्री नसल्यामुळे काही भागात घरातील मतदार मोजण्यासाठी काही पक्षांनी कार्यकर्ते पेरले आहेत. हे कार्यकर्ते घरोघरी फिरून मतदार आहे का, असल्यास किती जण आहेत, अशी माहिती गोळा करून लक्ष्मीपत्र वाटण्यासाठी खात्रीशीर माहिती गोळा करण्याचा सर्वे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com