आई-वडिलांच्या मृत्यूनंतरच सावत्र मुलांना मालमत्तेत हक्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - दुसऱ्या विवाहानंतर झालेल्या मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेवर आई-वडिलांच्या हयातीमध्ये हक्क दर्शविता येणार नाही; मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मुले हक्क मागू शकतात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

मुंबई - दुसऱ्या विवाहानंतर झालेल्या मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेवर आई-वडिलांच्या हयातीमध्ये हक्क दर्शविता येणार नाही; मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मुले हक्क मागू शकतात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

दुसऱ्या विवाहातून झालेल्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मिळू शकतो; मात्र आई-वडिलांच्या हयातीत हे हक्क मिळू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. स्वाती फणसाळकर-जोशी यांनी हा निर्णय दिला आहे. पुण्यातील एका युवकाने त्याच्या भावासह वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.

याचिकादार हे वडिलांच्या दुसऱ्या पत्नीची मुले आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेत आम्हाला हिस्सा मिळू शकतो. त्यामुळे आम्हाला आमचा वाटा द्या, अशी मागणी याचिकादारांनी केली होती; मात्र, याला वडिलांनी आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी तीव्र विरोध केला.

याचिकादार मुलांना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो; मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ते यामध्ये हक्क सांगू शकतात. हा हक्क त्यांना वारसा हक्काने मिळतो. त्यामुळे सर्व मुलांप्रमाणे हा हक्क मिळणार, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे याचिकादार मुलांना सरसकट सर्व मालमत्तेवर अधिकार मिळू शकत नाही, तर केवळ त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवरच अधिकार मिळू शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असून, मुलांची याचिका नामंजूर केली.

Web Title: property rites mother father death high court