मालमत्ता कर थकवणाऱ्यांची यादी तयार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - महापालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या 100 जणांची यादीच तयार केली असून, यात सुब्रतो रॉय यांच्या विलेपार्ले येथील हॉटेलसह शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कोहिनूर प्लानेट कन्स्ट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेडचेही नाव आहे. त्याचबरोबर वरळी पोलिस वसाहतीचा तब्बल 36 कोटी रुपयांचा कर थकीत आहे.

मालमत्ता कर थकविणाऱ्या प्रमुख 100 जणांनी यादी महापालिकेने तयार केली असून, त्यांनी 97 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. सहारा हॉटेलचा दोन कोटी 92 लाख रुपयांचा कर थकला आहे, तर मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी आणि मुलगा उन्मेष जोशी संचालक असलेल्या कोहिनूर प्लानेट कन्स्ट्रक्‍शनचा तब्बल दोन कोटी 69 लाखांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्याचबरोबर मुंबईतील मोठी कंपनी असलेल्या लार्सन अँड टुर्बो या कंपनीने पालिकेचा एक कोटी 16 लाख रुपयांचा कर थकवला आहे. ही सर्व प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका करवसुलीची कारवाई करते. यात 21 दिवसांची नोटीस दिल्यानंतर थकीत कर न भरल्यास पाणीपुरवठा बंद केला जातो, अशी माहिती उपायुक्त बापू पवार यांनी दिली. पालिकेने यंदा मालमत्ता कर थकविणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: property tax arrears list ready