ठाणेकरांना मालमत्ता करात दुप्पट सवलत?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

वसुलीच्या उद्दिष्टासाठी ठामपाची क्‍लृप्ती
ठाणे - ठाणे महापालिकेने मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदा युद्धपातळीवर बिले बनवून विशिष्ट मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांना चक्क दुप्पट सवलत (सूट) देण्याचे जाहीर केले आहे.

वसुलीच्या उद्दिष्टासाठी ठामपाची क्‍लृप्ती
ठाणे - ठाणे महापालिकेने मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदा युद्धपातळीवर बिले बनवून विशिष्ट मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांना चक्क दुप्पट सवलत (सूट) देण्याचे जाहीर केले आहे.

त्यानुसार सन 2017-2018 चा मालमत्ता कर थकबाकीसह चालू वर्षाची रक्कम निर्धारित कालावधीत अदा केल्यास पुढील सहामाहीवर कमाल 10 टक्के ते किमान दोन टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय दहाही प्रभाग समित्यांची बिले पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून, ऑनलाईन पद्धतीनेही कर भरता येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या कर विभागातून देण्यात आली.

वसुलीसाठी ऑनलाइन ई-सुविधा कर भरण्याची सोय असून, पालिकेच्या 10 प्रभागांत 20 करसंकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी निर्धारित काळात बिल भरण्यासाठी पूर्वी पाच टक्के सूट दिली जात असे, ती आता 10 टक्के जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 31 मेपर्यंत करभरणा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या करात 10 टक्के सूट, 1 ते 30 जूनपर्यंत भरणा केल्यास चार टक्के सूट, 1 ते 30 जुलैपर्यंत भरणा केल्यास तीन टक्के व 1 ते 31 ऑगस्टपर्यंत दोन टक्के सूट देण्यात येणार आहे. याखेरीज उशिरा करभरणा केल्यास दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती कर उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

चारपट मालमत्ताकराचा पुर्नविचार
ठाणे महापालिकेने भांडवली मुल्ल्यावर आधारीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर 2016-2017 या आर्थिक वर्षापासून रेटेबल व्हॅल्यूनुसार कर आकारणी सुरु केल्याने घोडबंदरपट्यातील (2016 नंतर वापर परवाना घेतलेल्या) नव्या सदनिकाधारकांना चारपट मालमत्ताकर आला. हे प्रमाण एकूण मालमत्तांच्या तुलनेत अत्यल्प असून त्यावर प्रशासनाकडून पुर्नविचार सुरु असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

प्रतिसाद मिळणार का?
या वर्षीचा पालिकेचा अर्थसंकल्प 3 हजार 390 कोटी 78 लाखांचा असून महसुली उत्पन्न 2 हजार 233 कोटी अपेक्षित धरले आहे. यामध्ये मालमत्ताकरापासून 480 कोटी उत्पन्न मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने 500 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर माफ करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हा, पालिकेच्या या कर सवलतीला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Web Title: property tax double concession