ठाणेकरांवर मालमत्ता कराचा बोजा

ठाणेकरांवर मालमत्ता कराचा बोजा

पालिकेच्या अर्थसंकल्पात जललाभ करातही वाढ
ठाणे - ठाण्यात एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेने आपल्या वचननाम्याच्या पूर्ततेच्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली असतानाच महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात दरवाढ सुचवून गुरुवारी सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिला. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ता करात 10 टक्के वाढ सुचवली आहे. जललाभ आणि मललाभ करातही 40 कोटींची दरवाढ सुचवण्यात आली आहे. दरम्यान, मालमत्ता करात वाढ करण्यास शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे.

पालिकेची स्थायी समिती अद्याप स्थापन झाली नसल्याने आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे तीन हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.

500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची तसेच 700 फुटांपर्यंतच्या घरांना या करात सवलत देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने पालिका निवडणुकीच्या प्रचारात दिले होते; मात्र पालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांचा वचनमाना बाजूला ठेवत निवासी तसेच बिगरनिवासी अशा दोन्ही प्रकारांत सरासरी 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सव्वादोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारला तेव्हा पालिकेचे उत्पन्न 1154 कोटी होते. कठोर आर्थिक शिस्ती आणि उत्पन्नवाढीसाठी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे हे उत्पन्न 23000 कोटीपर्यंत पोचले. त्यामुळे अर्थसंकल्प अधिक मजबूत होण्यास मदत झाली. भविष्यातील विकासकामे लक्षात घेऊन मालमत्ता करात वाढ करणे गरजेचे आहे.
- संजीव जयस्वाल, पालिका आयुक्त, ठाणे

प्रमुख तरतुदी
प्रशासकीय खर्च - 183 कोटी 7 लाख
सार्वजनिक आरोग्य सुविधा - 694 कोटी तेवीस लाख
शिक्षण - 249 कोटी 84 लाख
पाणीपुरवठा - 199 कोटी 54 लाख
मलनिःसारण - 314 कोटी चार लाख
रस्ते, पूल व भुयारी मार्ग - 733 कोटी 65 लाख
घनकचरा व्यवस्थापन - 547 कोटी 93 लाख
परिवहन सेवा - 122 कोटी 50 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com