महिन्यात 23 कोटींची मालमत्ता कर वसुली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नवी मुंबई - एप्रिल महिन्यात तब्बल २३ कोटींची मालमत्ता कर वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. तीन वर्षांमध्ये एप्रिलमध्ये केलेल्या कर वसुलीत हा उच्चांक आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मालमत्ता कर विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे ही वसुली करण्यात यश आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सहा महिन्यांतून एकदा अशी वर्षातून दोन वेळा मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेतर्फे देयके दिली जातात. मात्र मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर भरण्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली रखडते; परंतु एप्रिलमध्ये वाटप केलेल्या देयकांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने सुरुवातीपासूनची देयके चुकती करण्यासाठी तगादा लावला होता. त्यात ध्वनिक्षेपकावरून जनजागृती, कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा, थकबाकीदारांना नोटिसा बजावणे अशी मोहीम राबवली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये २३ कोटींची वसुली झाली. २०१५ च्या एप्रिलमध्ये ११ कोटी ७६ लाख, २०१६ मध्ये १४ कोटी १२ लाख आणि २०१७ मध्ये नऊ कोटी ७४ लाख इतकी मालमत्ता कर वसुली झाली होती; परंतु या एप्रिलमध्ये २३ कोटींची वसुली झाल्यामुळे पुढील सहा महिन्यांतील वसुली करणे पालिकेला सोपे जाणार आहे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यास मदत होते.

Web Title: Property tax recovery of 23 crores in the month