सामाजिक जाणिवेतून संरक्षण साहित्यनिर्मिती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्यनिर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये 20 एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे घेतला. या संरक्षण साहित्य उत्पादन क्‍लस्टरच्या माध्यमातून सुमारे 50 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

मुंबई - सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्यनिर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये 20 एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे घेतला. या संरक्षण साहित्य उत्पादन क्‍लस्टरच्या माध्यमातून सुमारे 50 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी राज्यातील विविध ठिकाणच्या विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रिअल हब कंपनीला मिहान येथील सेक्‍टर 10 मधील सुमारे 20 एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून याठिकाणी विविध संरक्षण साहित्यनिर्मिती केली जाणार आहे. त्यातून सुमारे 50 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पासाठी भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

विमानतळांच्या कामाचा आढावा
शिर्डी विमानतळ येथे रात्री विमान धावपट्टीवर उतरण्याची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर (पुणे), बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमान सेवा जोडणी योजनेतील कामांचाही या वेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे निर्णय
- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नगर नियोजन विभागाचे बळकटीकरण
-विविध आवश्‍यक 21 पदे तातडीने भरण्याच्या सूचना
- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन हजार विमानांच्या फेऱ्या
- विमातळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करणार
- सध्याची 2500 मीटर लांबीची धावपट्टी 3200 मीटर होणार

Web Title: Protective materials from social awareness