सोशल मीडियावरुन तरूणीला त्रास देणाऱ्या माथेफिरुला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत

मुंबई : सोशल मीडियावरील गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत असून अशीच एक घटना मुंबईतील मुलुंड येथे समोर आली आहे. सोशल मीडियावर तरूणीशी मैत्री झाल्यानंतर त्या तरूणीला त्रास देणाऱ्या एका माथेफिरुला दापोलीतून नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्रिंबक गिरी (38) असे अटक केलेल्या माथेफिरुचे नाव असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तक्रारदार तरुणी ही 30 वर्षांची असून मुलुंडच्या नवघर परिसरात वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची त्रिंबक गिरीशी सोशल मिडीयाद्वारे ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले. ते दोघेही व्हॉटअपसह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले. तिनेही त्याला होकार दिला.

मात्र त्यानंतर त्याने तिला काही अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ पाठविले. या व्हिडिओप्रमाणे त्याने तिला तिचे स्वतःचे व्हिडिओ बनवून पाठवायला सांगितले. तसेच तिने तसे न केल्यास तिच्यावर बलात्कार करून बदनामी करण्याची धमकीही दिली. या धमकीनंतर तिने त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. तरीही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा पाठलाग करीतच होता.

अखेर बदनामीच्या भीतीने सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र पुढे मनस्ताप जास्तच वाढू लागल्यानंतर तिने नवघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी त्रिंबक गिरीविरुद्ध गुन्हा दाखल होताच आरोपीचा शोध सुरु केला.

 

तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला केली अटक

आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा पत्ता देखील काढला. तपासात तो उरण येथील दापोलीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर या पथकाने उरण येथून त्रिंबक गिरी याला अटक केली.  पोलीस तपासात त्रिंबक हा याच परिसरातील एका कॅण्टीनमध्ये अकाऊंटंट म्हणून कामाला असल्याचे स्पष्ट झाले. तो मूळचा लातूरचा रहिवाशी आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यांत वापरण्यात आलेला मोबाईल हस्तगत केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: psycho guy arrested for harassing young woman on social media