लोकप्रतिनिधींच्या रुग्णांना पालिकेची 'व्हीआयपी ट्रीटमेंट'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - आमदार, खासदार आणि नगरसेवकांशी सौजन्याने वागा, त्यांनी पाठवलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा, असे परिपत्रक महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपल्या रुग्णालयांना पाठवले आहे. देशभरात लाल दिव्याची "व्हीआयपी' संस्कृती बंद झाल्यानंतर महापालिकेने ही "व्हीआयपी' प्रथा सुरू केली आहे.

शीव येथील टिळक रुग्णालयात मार्चमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरला मारहाण केली होती. त्यानंतर निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन केले होते. त्याचे पडसाद न्यायालयापासून अर्थसंकल्पी अधिवेशनापर्यंत उमटले होते. अखेर आणखी कडक सुरक्षा पुरवण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर डॉक्‍टर कामावर रुजू झाले होते. या मारहाणीनंतर एप्रिलअखेर पालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी परिपत्रक काढून सर्व डॉक्‍टरांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला.

या परिपत्रकातच डॉ. सुपे यांनी लोकप्रतिनिधींनी पाठवलेल्या रुग्णांना "व्हीआयपी ट्रीटमेंट' देण्याचे निर्देश डॉक्‍टरांना दिले आहेत. आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी पाठवलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करा, असा आदेशही दिला आहे.

नगरसेवकांमध्येही भेदभाव?
डॉ. सुपे यांनी नगरसेवकांची यादीही सर्व रुग्णालयांना पाठवली आहे. त्यात सार्वजनिक आरोग्य, स्थायी, शिक्षण, सुधार या समित्यांच्या सदस्यांबरोबरच गटनेत्यांचीही नावे आहेत. त्यामुळे याच नगरसेवकांना फक्त "व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळणार का, असा प्रश्‍नही विचारला जात आहे.

Web Title: public leader patient vip treatment in municipal hospital