ट्विटर हॅंडलद्वारे जनजागृती!

ट्विटर हॅंडलद्वारे जनजागृती!

सोशल मीडियावर  हवी ती माहिती सहज मिळते. शहरातील घडामोडींची माहिती मिळावी आणि नागरिकांच्या तक्रारी व सूचना जाणून घेता याव्यात, यासाठी मुंबई पोलिसांनी स्वत:चे ट्विटर हॅंडल वर्षभरापूर्वी सुरू केले.

वर्षभरात या हँडलचे साडेसात लाख फॉलोअर्स आहेत. महिलांनी ट्विटरवर केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी छेड काढणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. ‘पोलिस दीदी’ ही संकल्पना पोलिसांनी ट्विटरवर आणली. त्यामुळे लहानग्यांना केल्या जाणाऱ्या ‘नकोशा’ स्पर्शाबाबत जनजागृती करणे पोलिसांना शक्‍य झाले.  

डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी मुंबई पोलिसांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरू केले. त्यासाठी आयुक्तालयात खास कक्ष सुरू झाला. अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक ट्विटर हॅंडल सांभाळत आहेत. ट्विटर हॅंडल सुरू केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात एक हजार फॉलोअर्स झाले. वाहतूक आणि महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्‌स या हॅंडलवरून अपलोड केले जातात. विशेष म्हणजे, जितके जास्त फॉलोअर्स तितक्‍या जास्त अपेक्षा नागरिकांना पोलिसांकडून असतात. 

शहरात उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत जास्त तक्रारी या ट्विटर हॅंडलवर करण्यात आल्याची नोंद आहे. बेकायदा बांधकाम, रस्त्यावरचे अतिक्रमण, वाहनचालकांची दादागिरी याबाबत पोलिसांकडे सतत तक्रारी येत असतात. तक्रारी आल्यावर तत्काळ कारवाई अपेक्षित असते. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता जनजागृतीपर उपक्रम, महत्त्वाचे संपर्क क्रमांक पोलिसांनी ट्विटरवर अपलोड केलेत. त्याचा फायदा महिलांना होत आहे. गतवर्षी मालाड येथील एका तरुणीची वाहनचालकाने छेड काढली होती. त्या तरुणीने वाहनाचा फोटो पोलिसांच्या ट्विटरवर अपलोड केला होता. या घटनेची माहिती संबधित पोलिस ठाण्याला कळवण्यात आली. पोलिसांनी तपास करून काही तासांतच त्या वाहनचालकाला अटक केली होती. 

२०१६ मध्ये शहरात लहानग्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या होत्या. त्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘पोलिस दीदी’ हा उपक्रम सुरू केला. पोलिस दीदी नेमकी काय आहे, ती विद्यार्थ्यांना नकोशा स्पर्शाबाबत कसे समजावून सांगते, हे ट्विटरवरून पोलिसांनी स्पष्ट केले होते. पोलिसांच्या ट्विटरवर आतापर्यंत सर्वाधिक तक्रारी या वाहतुकीसंदर्भात आहेत.

नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्यांनी थेट ट्विटरवर तक्रारी करण्यास सुरुवात केली. नेटकरांना नियमित वाहतुकीचे अपडेट्‌स दिले जात आहेत. कित्येकदा वरिष्ठ आयपीएस अधिकारीही ट्विटरवरील तक्रारींना प्रतिसाद देत असतात. ट्विटरचे स्वरूप पाहता तरुणांना आपलीशी वाटणारी आणि सहज समजणारी भाषा वापरली जात असल्याने मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर फॉलोअर्सचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com