पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसचे 'पृथ्वी'अस्त्र

Congress-Prithvi
Congress-Prithvi

मुंबई - कॉंग्रेसची धुरा राहुल गांधी यांच्या खांद्यावर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी धक्कादायक निर्णय होण्याची शक्‍यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा पारदर्शक व स्वच्छ चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवले जाण्याची शक्‍यता असून, त्याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिली.

पुणे लोकसभा हा चाणाक्ष मतदारांचा मतदारसंघ मानला जातो. पुणे शहरात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा सुजाण युवा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. सभ्यता व पारदर्शकतेला इथला मतदार कौल देतो, अशी परंपरा असल्याने कॉंग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची रणनीती असल्याचे मानले जाते. चव्हाण यांची प्रतिमा या उच्चशिक्षित वर्गात सभ्य व पारदर्शक राजकीय नेता अशी आहे. या मतदारांवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. त्याच वेळी दिल्लीत राहुल गांधी यांना विश्वासू व अनुभवी राष्ट्रीय राजकारण व प्रशासनाची जाण असलेल्या नेत्यांची मजबूत फळी उभी करायची आहे. त्यासाठी चव्हाण यांना राज्याच्या राजकारणातून पुन्हा दिल्लीत सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून पुणे कॉंग्रेसमधला त्यांचा वावर व संपर्क वाढल्याचा दाखला दिला जात आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून विनायक निम्हण व राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र पक्षांतर्गत अहवालासह काही खासगी कंपन्याकडूनही मतदारसंघाची मानसिकता पडताळणी सुरू आहे. 2014 मध्ये कॉंग्रेसच्या वतीने विश्वजित कदम या युवा चेहऱ्याला इथे संधी दिली होती. मात्र मोदीलाटेत पुण्यासारख्या मतदारसंघात त्यांचा निभाव लागला नाही.

सध्या 2014 ची परिस्थिती नसून शहरी मध्यमवर्ग व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे डोळसपणे पाहणाऱ्या उमेदवाराला पुणेकर मतदार कौल देऊ शकतो, असा विश्वास असल्यानेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात सुरू असल्याची माहिती आहे.

चव्हाण यांचे मत महत्त्वाचे
पुण्यातून लोकसभा लढविण्याच्या प्रस्तावाला खुद्द चव्हाण हे कितपत अनुकूल राहतील, याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्यांच्या नावाची पुण्यासाठी या आधी चर्चा झाली होती. तेव्हा त्यांनी आपला स्वतःचा सातारा जिल्हा सोडणार नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या या मतात बदल झाला आहे की नाही, हे आगामी काळात कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com