मुंबईचे पाणी एक नंबर! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

दिल्ली अखेरच्या क्रमांकावर

मुंबई : मुंबईतील नळाला येणारे पाणी देशात अव्वल क्रमांकाचे ठरले आहे. देशाची राजधानी दिल्लीसह 21 राज्यांच्या राजधानीच्या शहरांत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. भारतीय मानक प्राधिकरणाने आखलेल्या निकषांनुसार ही तपासणी करण्यात आली. देशात मुंबईतील नळाला येणारे पाणी "नंबर वन' ठरले. त्यामुळे नळाला आलेले पाणी थेट पिण्यासाठी वापरले तरी काळजी करण्याचे कारण नाही. 

केंद्रीय ग्राहक, अन्नपुरवठा व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी (ता. 16) दिल्लीत ही माहिती दिली. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील पाण्याचा क्रमांक सर्वांत शेवटचा म्हणजे 21 वा आहे. देशभरात "गुजरात पॅटर्न'चा बोलबाला असला, तरी या राज्याची राजधानी गांधीनगरला महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात गांधीनगरच्या पाण्याचा क्रमांक 14 वा आहे. देशातील 13 राज्यांच्या राजधानीच्या शहरांमधील पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असे पासवान यांनी सांगितले. पिण्यायोग्य पाण्यासाठी बीएसआयने 48 कसोट्यांवर तपासणी केली होती. वायुप्रदूषणाला तोंड देणाऱ्या दिल्लीकरांनाच सर्वांत अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. या यादीत तळाला असलेल्या दिल्लीतील नागरिकांची हवा आणि पाणी अशा दुहेरी प्रदूषणाने कोंडी झाली आहे.

सरकारने 10 निकषांच्या आधारे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली. यात हैदराबादने दुसरा; तर भुवनेश्‍वरने तिसरा क्रमांक मिळवला. दिल्लीतील पाण्याच्या 11 नमुन्यांची आणि मुंबईतील 10 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मुंबईत 2012-13 मध्ये महापालिकेने केलेल्या तपासणीत पाण्याचे 17 टक्के नमुने पिण्यासाठी योग्य नसल्याचे आढळले होते. या नमुन्यांमध्ये गटारातील पाण्यात आढळणारा ई-कोलाय हा विषाणू सापडला होता. हे प्रमाण 2018-19 मध्ये 0.7 टक्‍क्‍यांवर आले होते. 

..............

सर्वांत शुद्ध पाणी 
1) मुंबई, 2) हैदराबाद, 3) भुवनेश्‍वर, 4) रांची, 5) रायपूर, 6) अमरावती, 7) सिमला, 8) चंडीगड, 9) त्रिवेंद्रम, 10) पाटणा, 11) भोपाळ, 12) गुवाहाटी, 13) बंगळूर, 14) गांधीनगर, 15) लखनौ, 16) जम्मू, 17) जयपूर, 18) डेहराडून, 19) चेन्नई, 20) कोलकाता, 21) दिल्ली.
 

............

तीन महानगरांची स्थिती वाईट 
दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांत पाण्याचा दर्जा खालावलेला आहे. या शहरांचे क्रमांक अनुक्रमे 19, 20 आणि 21 वे आहेत. आधुनिकतेच्या शर्यतीत असलेली ही शहरे नागरिकांना शुद्ध पाण्यासारखी मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाहीत. 

..........

भारतीय मानक ब्युरोच्या (बीएसआय) मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. देशात प्रदूषण आणि पिण्याचे पाणी या दोन मोठ्या समस्या आहेत. माझ्याकडे जोपर्यंत हे मंत्रालय आहे, तोपर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवण्याची व्यवस्था केली जाईल. ज्या राज्याला सरकारी मदत हवी असेल, ती देण्यात येईल. 
- रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक व अन्नपुरवठा मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purest water in the country