esakal | पुष्पक एक्स्प्रेसमध्ये टोळक्याची लुटमार, तरुणीवर अत्याचार; चार संशयीत अटकेत | crime
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये टोळक्याची लुटमार, तरुणीवर अत्याचार; चार संशयीत अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा


कल्याण : धावत्या लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (pushpak express) शुक्रवारी रात्री आठ वाजता दहा जणांच्या टोळक्याने घुसून डब्यातील प्रवाशांना मारहाण व लूटमार करून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार (woman molestation) केल्याची घटना घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी (kalyan railway police) गुन्हा दाखल (FIR) करीत चार संशयित आरोपींना अटक केली. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: नवी मुंबई: दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार

अटक आरोपींमध्ये प्रकाश ऊर्फ ​​पक्या, अर्शद हुसेन शेख, अर्जुन सुभाषसिंग परदेशी, किशोर नंदू सोनवणे ऊर्फ ​​काळू यांचा समावेश आहे. ते इगतपुरी आणि मालाडचे रहिवासी आहेत.
कल्याण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठ वाजता इगतपुरी रेल्वेस्थानकात लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस आली. या वेळी दहा जणांचे टोळके डब्यात घुसले. रेल्वे इगतपुरी ते कसारादरम्यान घाटात येताच त्यांनी चाकू, ब्लेड, फायटरच्या साह्याने प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून मोबाईल, पैसे हिसकावून घेतले. जे विरोध करत होते त्यांना बेदम मारहाण केली. प्रवाशांकडून पैसे व मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर त्या डब्यातील एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.

कसारा रेल्वेस्थानक येताच टोळक्यातील काही जण पळाले. या टोळक्याने १५ प्रवाशांकडून ९६ हजार ३९० रुपये लुटले. त्यातील ३४ हजार २०० रुपये पोलिसांनी वसूल केले. प्रवासी ही घटना पाहून घाबरले असताना काही प्रवाशांनी धैर्य दाखवले आणि एका आरोपीला पकडले. आणखी एका आरोपीला कसारा रेल्वे सुरक्षा दलाने ट्रेनमधून खाली उतरताना पकडले. चार आरोपी अद्याप फरारी आहेत. त्यांना पकडण्यासाठी चार पथके रवाना केली आहेत.

हेही वाचा: नवी मुंबईला डबल ए प्लस स्टेबल मानांकन; सलग सातव्यांदा मानकरी

या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस उपायुक्त मनोज पाटील कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आले. या गुन्ह्यातील आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून, यामधील सात जण घोटीमध्ये राहतात, तर एक जण मुंबईत राहतो. नशेच्या धुंदीत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे. पीडित तरुणीची तब्येत स्थिर असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.

देशी कट्टा, चाकूचा धाक

कुर्ला येथील रहिवासी अंकुश कुमार यांनी सांगितले की, मारहाण केल्यानंतर देशी कट्टा आणि चाकू दाखवून ही लूट केली. त्यांनी टोळक्याला प्रतिकार केल्यामुळे अंकुशच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या मुस्ताक अली याने सांगितले की, माझी पाच हजार रोख आणि मोबाईल चोरला. मुस्ताक हा भिवंडीचा रहिवासी असून, तो यंत्रमागमध्ये मजूर म्हणून काम करतो.

loading image
go to top