तळपत्या उन्हातही बॅंकांसमोर रांगा 

तळपत्या उन्हातही बॅंकांसमोर रांगा 

मुंबई - मुंबईचे तापमान 35 अंशांवर जाऊनही नागरिक न दमता गुरुवारी (ता. 17)ही बॅंकांसमोरील मोठ्या रांगांमध्ये उभे होते. त्यातच कुठले एटीएम चालू आहे आणि कुठले बंद हे समजत नसल्याने गोंधळात भर पडल्याने त्यांच्या मनस्तापात भर पडली. नोटाबंदी निर्णयाच्या दहाव्या दिवसांनंतरही खातेदारांची धावपळ थांबण्याची लक्षणे नाहीत. 

गेले काही दिवस मुंबईतील तापमान वाढत चालले आहे; मात्र उन्हाचा कडाका सहन करूनही खातेदार काही केल्या पैसे मिळवायचेच, अशा ईर्षेने बॅंकांसमोरील रांगेत दोन-तीन तास उभे राहत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या बॅंकांसमोर त्यांच्या सोईसाठी मंडपही घालण्यात आले आहेत. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या खुर्च्या, छत्र्या आणि जलपान सेवा आता अदृश्‍य होत असल्याचेही दिसून येत आहे. 

एटीएममुळे मनस्ताप 

बहुसंख्य एटीएम अजूनही सुरू झालेली नाहीत. सुरू झालेल्या एटीएममध्ये शंभराच्या नोटा असल्याने त्या लगेच संपतात. अगदी क्वचित काही एटीएममधून दोन हजारांची नोट मिळू लागली आहे. एटीएममधील रोख रक्कम संपली तरी तसा फलक बाहेर लावला जात नाही. उलट एटीएम बंद असल्याची स्लीप बाहेर येईपर्यंत दोन-तीन मिनिटे खातेदारांचा खोळंबा होत आहे. एक जण आत व्यवहार करत आहे म्हटल्यावर बाहेरही रांग लागते. कोणत्या एटीएममध्ये रोख रक्कम आहे ते सांगणाऱ्या वेबसाईट असल्याचे संदेश सर्वत्र फिरत होते; मात्र तेथेही नीट माहिती मिळत नव्हती किंवा दिलेली एटीएम सेंटरदेखील रिकामी असल्याचे दिसत होते. 

म्हाडाचे उद्‌घोषणा वाहन 

सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन नागरिकांनी करभरणा करावा म्हणून म्हाडातर्फे गुरुवारी उद्‌घोषणा करणारे वाहन म्हाडाच्या वसाहतींमध्ये फिरविण्यात आले. नागरिकांनी रद्द झालेल्या जुन्या मोठ्या नोटांच्या रूपात 24 नोव्हेंबरपर्यंत करभरणा करावी, असे त्याद्वारे सांगितले जात होते. 

दोनशेची नोट काढण्याची मागणी 

सध्या सुट्या पैशांची चणचण असल्याने सरकारने दोनशे रुपयांची नोट चलनात आणावी, अशी मागणी ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजने केली आहे. त्यामुळे नागरिकांना व्यवहार करणे आणखी सोपे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

काळाबाजार तेजीत 

दोन हजाराची नोट मिळाली तरी बाजारात सुटे पैसे कोठून आणायचे, अशी चिंता नागरिकांना लागली आहे. परिणामी सुट्या नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी दुकानदारही हजाराच्या बदल्यात आठशे रुपये देत आहेत. याचा अर्थ दुकानदारांकडे सुटे पैसे असल्याने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com