ठाण्यात तरणतलावाच्या प्रवेशासाठी रांगा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

ठाणे - शाळेच्या ऍडमिशनपासून ते रेशनिंगच्या दुकानापर्यंत... आणि मंदिराच्या दर्शनापासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंत रांगा लागण्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. अलीकडे ऑनलाईन प्रक्रियेमुळे रांगांच्या मनस्तापामधून नागरिकांची काहीशी सुटका झाली असली, तरी ठाण्यात चक्क तरणतलावाच्या प्रवेशासाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत. स्वस्तात सदस्यत्व मिळवण्यासाठी नागरिक तरणतलावाच्या बाहेर 24 तास आधीच हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे ऍडमिशन फॉर्म वाटल्यानंतर त्यातील किती जणांना नव्याने ऍडमिशन मिळेल, याचीही शाश्‍वती नसल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

ठाणे - शाळेच्या ऍडमिशनपासून ते रेशनिंगच्या दुकानापर्यंत... आणि मंदिराच्या दर्शनापासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंत रांगा लागण्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. अलीकडे ऑनलाईन प्रक्रियेमुळे रांगांच्या मनस्तापामधून नागरिकांची काहीशी सुटका झाली असली, तरी ठाण्यात चक्क तरणतलावाच्या प्रवेशासाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत. स्वस्तात सदस्यत्व मिळवण्यासाठी नागरिक तरणतलावाच्या बाहेर 24 तास आधीच हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे ऍडमिशन फॉर्म वाटल्यानंतर त्यातील किती जणांना नव्याने ऍडमिशन मिळेल, याचीही शाश्‍वती नसल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. अनेक महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलेही रांगेत रात्रभर जागत असल्याचे चित्र यानिमित्ताने येथे दिसल्याने या प्रवेशासाठी ऑनलाईन सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ठाणे महापालिकेच्या मालकीचा मारोतराव शिंदे तरणतलाव तलावपाळीच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळ आहे. छोट्या आकाराच्या या तलावात अत्यंत मर्यादित सदस्यांना संधी दिली जाते. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे शुल्कही अत्यंत मर्यादित आहे. शहरातील इतर तरणतलावांमध्ये लाखो रुपयांचे सदस्य शुल्क घेतले जात असताना या तरणतलावात एका वर्षासाठी केवळ 3300 रुपये घेतले जात असल्याने येथे ऍडमिशन मिळवण्यासाठी नागरिकांची चढाओढ सुरू असते. दिवसभरात आठ बॅचमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक सदस्य पोहण्याचा आनंद घेतात. सोमवारी सकाळी सात वाजता या तरणतलावासाठी प्रवेश अर्ज निघणार असल्याची माहिती तरणतलावाने घोषित केली आणि सदस्यत्व मिळवण्यासाठी रविवारपासून तरणतलावाच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या रांगा वाढतच गेल्या आणि पाचशेहून अधिक नागरिक या रांगात उभे होते. सकाळी सात वाजता तरणतलाव सुरू झाल्यानंतर पहिल्या 200 नागरिकांना टोकन देऊन इतरांना या वेळी अर्ज मिळणार नाही, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे रविवारपासून रांगेत उभे राहिलेले आणि रात्र जागून काढलेल्या नागरिकांना नाइलजाने हात हलवत परतावे लागले. 

ऑनलाईन प्रवेश विचारधीन... 
मारोतराव शिंदे तरणतलावाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात यावा, यासाठी आम्ही तशी विनंती वरिष्ठांकडे पाठवली आहे. त्यावर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील. नागरिकांनी रांगा लावण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो. ऑनलाईन प्रक्रियेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- चंद्रकांत शिंगळे, व्यवस्थापक, मारोतराव शिंदे तरणतलाव, ठाणे. 

Web Title: Queues for the swimming pool in thane

टॅग्स