रबाळे एमआयडीसी-रामनगर रस्ता अंधारात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नवी मुंबईतील मुकंद कंपनी नजीक रामनगरपासून रबाळे एमआयडीसीला जाण्याकरिता वर्षभरापूर्वी नवीन रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानाही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

नवी मुंबई ः नवी मुंबईतील मुकंद कंपनी नजीक रामनगरपासून रबाळे एमआयडीसीला जाण्याकरिता वर्षभरापूर्वी नवीन रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानाही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्याचे प्रकारदेखील सुरू आहेत. या रस्त्यावर पथदिवे बसविण्याचा पालिकेचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत मुकंद कंपनी ते यादवनगर-रबाळे आणि एमआयडीसीला जोडणारा रामनगर प्रवेशद्वारावरील हा मुख्य रस्ता आहे. रबाळे ते तुर्भे एमआयडीसी रस्त्याचे काम पूर्ण झाले तरी या रस्त्याचे काम मार्गी न लागल्याने अनेक वर्षांपासून हा रस्ता रखडला होता. मात्र, आता या प्रशस्त चारपदरी रस्त्याचे काम पूर्ण होऊनदेखील या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. तर रस्त्याच्या मध्ये बसविण्यात येणाऱ्या मुख्य पथदिव्यांसाठी खोदकाम आणि विद्युतवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र विजेचे खांब मागील वर्षभरापासून बसविण्यात न आल्याने हा रस्ता नागरिकांसाठी वापराकरिता खुला झाल्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. 

दैनंदिन शेकडो वाहनचालक या रस्त्याचा वापर करीत असून, ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास रबाळे, महापे, तुर्भे, डोंबिवली, कल्याणकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर केला जातो. याबाबत कार्यकारी अभियंता शंकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

नामांकित कंपन्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ सुविधा देण्याची गरज आहे.
- मिलिंद जाधव, स्थानिक नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabale MIDC-Ramnagar road in the dark