रॅगिंगप्रकरणी 15 डॉक्टरांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पालघरमधील वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

पालघर : डॉक्‍टर एम. एम. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथी महाविद्यालयात पदव्युत्तरच्या विद्यार्थिनीचा वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मानसिक छळ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार पालघर पोलिसांनी महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत महाविद्यालयातील 15 वरिष्ठ डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित विद्यार्थिनी तीन दिवसांपूर्वीच प्रशिक्षणासाठी महाविद्यालयात रुजू झाली होती. महाविद्यालयात गुरुवारी (ता. 14) "फ्रेशर्स पार्टी'चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी काही वरिष्ठ विद्यार्थ्यांशी ओळख करून घेत असताना काही डॉक्‍टरांनी तिचा मानसिक छळ केला. यासंदर्भात तिने शुक्रवारी (ता. 15) पालघर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून सुरुवातीला तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडित तरुणी तक्रारीवर ठाम राहिल्याने पोलिसांनी 15 वरिष्ठ डॉक्‍टरांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकूर हे पुढील अधिक तपास करीत आहेत. 

........ 

पोलिसांत तक्रार करण्यापूर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे तक्रार केली नव्हती. पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे संस्था तपासात पूर्ण सहकार्य करेल. संस्थेकडूनही अंतर्गत चौकशी सुरू आहे. महाविद्यालयात "रॅगिंग'संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन होते. संस्थेच्या इतिहासातील ही पहिलीच तक्रार आहे. 
- आनंद कापसे, संचालक, 
एम. एम. ढवळे रुग्णालय व महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ragging : 15 doctors charged