
Raigad : केंद्रातून बूस्टर डोस गायब
खालापूर : काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यात मात्र कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यात महत्त्वाचा वाटा असलेले लसीकरण पूर्णपणे थंडावले आहे. खालापूर तालुक्यातही आरोग्य केंद्रातून बूस्टर डोस गायब झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट पुन्हा समोर आले आहे.
कोरोना संसर्गाची चौथी लाट सध्या सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी रुग्ण सापडले असले, तरी खालापूर तालुका मात्र अद्याप चौथ्या लाटेपासून दूर आहे. कोरोना रुग्ण संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रायगड जिल्ह्यात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी खालापूर तालुका होता.
तर तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचा रुग्णही खालापूर तालुक्यात सापडला होता. कोरोना संसर्गात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळवतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.
तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १२ हजार २९४ च्या घरात गेली होती. त्यापैकी २६१ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हजार ३३ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले होते. कोरोना लस आल्यानंतर संसर्गाला मोठ्या प्रमाणात आळा बसला. तालुक्यातही लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला;
मात्र बूस्टर डोस मर्यादित जणांनी घेतला आहे. आता कोरोना संसर्ग पुन्हा वेगाने पसरत आहे. त्यामुळे बूस्टर डोससाठी आरोग्य केंद्रात विचारणा होत आहे. मात्र, आरोग्य केंद्रातून बूस्टर डोसच उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळत आहे.
बूस्टर डोस घेतलेल्यांची खालापूरमधील संख्या
खालापूर-१६४४
कांढरोली-४
होनाड-४
बीड-६०
माणकिवली-५३
उंबरे-२१
लोहप-२२३४
मोहपाडा-१७
वासांबे-१५२
रिस-८४
वावोशी-१२३२
उसरोली-७
वडवळ-१४
चौक-९९
हातनोली-०
कलोते-७१
बोरगाव-४०