Raigad Building Collapse: NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर, दोघांचा मृत्यू

पूजा विचारे
Tuesday, 25 August 2020

सोमवारी संध्याकाळी महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला. यात ४१ कुटुंब राहत होते. त्यातील ६० जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईः सोमवारी संध्याकाळी महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला. यात ४१ कुटुंब राहत होते. त्यातील ६० जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ मदत कार्य सुरू केलं. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे. 

घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ८ तव, १० जेसीबी, ४ पोखलेन तसेच, १५ डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. सध्या पुणे, महाबळेश्वर ट्रेकर्स, पनवेल येथून फायर ब्रिगेडची टीम महाडमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.  ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे १० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ४५ ते ५० फ्लॅट होते. यात २०० ते २५० लोक राहत होते.

घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्याच्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. जखमी व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु असून काही जखमींवर करुन रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर काही गंभीर जखमी झालेल्या उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेसंदर्भात चौकशी सुरु झाली असून आम्हाला विशेष पथक स्थापन करावं अशी आमची इच्छा असल्याचं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. 

ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. ही इमारत पत्त्या सारखी कोसळली आहे. अजून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं. जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे जखमी आणि मृत पावले आहेत त्यांना सरकारकडून योग्य मदत दिली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिलेत. तसंच अजित पवार यांनी आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे.  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही फोन करुन बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

Raigad building collapsed Search & rescue operation by NDRF underway 2 deaths reported


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad building collapsed Search & rescue operation by NDRF underway 2 deaths reported