रायगड किल्ल्याचा रोप वे अडचणीत; बेस स्टेशनवर औकिरकर कुटुंबाचा दावा; वाडवडिलांची फसवणूक केल्याचा आरोप

सुनिल पाटकर
Tuesday, 22 September 2020

  • रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांच्या सोयीसाठी उभारलेला रायगड रोप वे जागेच्या वादात सापडला आहे.
  • हिरकणी वाडी येथे असलेले रोप वेचे बेस स्टेशन आपल्या मालकीच्या जागेत असल्याचा दावा येथील औकीरकर कुटुंबाने केला आहे

 

महाड : रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांच्या सोयीसाठी उभारलेला रायगड रोप वे जागेच्या वादात सापडला आहे. हिरकणी वाडी येथे असलेले रोप वेचे बेस स्टेशन आपल्या मालकीच्या जागेत असल्याचा दावा येथील औकीरकर कुटुंबाने केला आहे. एवढेच नाही तर या कुटुंबाने रोप वेची वाहतूक आणि रोप वे दुरुस्तीची कामे बंद पाडली आहेत.

NCBच्या जबाबात रिया चक्रवतीचे खळबळजनक विधान; सारा अली खानने सुशांतसोबत हेवी डोस घेतल्याचा खुलासा

रायगडावर पायी जाणाऱ्या पर्यटकांना केवळ चार मिनिटांत रोप वेमुळे गडावर पोहचता येत असल्याने येथील पर्यटक वाढू लागले; परंतु आता या जागेचा वाद पुढे आला आहे. चेतन औकीरकर, शिवाजी औकीरकर, रामचंद्र औकीरकर यांनी रोप वे पायथ्याशी पत्रकार परिषद घेत रोप वेची सध्या वापरात असलेली जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगितले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि जोग इंजिनिअरिंग कंपनी पुणे यांनी आमच्या वाडवडिलांची फसवणूक करून जागेचा ताबा घेतला. त्यानंतर रोप वेच्या बेस स्टेशनचे बांधकाम केले, असा दावा औकीरकर कुटुंबाने केला आहे. केवळ दावाच केला नाही, तर या कुटुंबाने रोप वेची वाहतूक आणि रोप वे दुरुस्तीची कामे बंद पाडली आहेत.

आजोबाच्या निधनानंतर वारस नोंद करताना हिरकणी वाडी येथील सर्व्हे क्रमांक 86 / 1 अ या 74 गुंठे जागेतील काही भागांवर अतिक्रमण करून रोप वेची उभारणी आणि रस्ता केल्याचे निदर्शनास आल्याचे औकीरकर कुटुंबीयांनी सांगितले. रोप वे साठी खरेदी केलेली जागा सध्याच्या रोप वेपासून सुमारे 150 मीटर अंतरावर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रोप वे वापरत असलेली जागा आपल्या मालकीची असल्याची तक्रार औकीरकर कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे केली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने या जागेची मोजणी करून घेण्याची सूचना श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि जोग इंजिनिअरिंग कंपनीला केली; मात्र ही मोजणी केली नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. याबाबत रायगड रोपवे प्रशासनाकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही .

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

रोप वे बंदमुळे होणार गैरसोय
सध्या रोप वेच्या प्रवेशद्वारावर औकीरकर कुटुंबाने प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे रोप वे बंद ठेवावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे रायगडवर प्रवेशबंदी आहे. मात्र, शिवभक्त आणि पर्यटकांसाठी गड खुला केल्यानंतर रोप वे बंद राहिल्यास मोठी गैरसोय निर्माण होणार आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad forts ropeway in trouble Aukirkar family claims at base station