esakal | शहर, गावोगावी रंगांची मुक्त उधळण
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई

कोकणात गणपती आणि होळी या दोन सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगडातही होळी सण तितक्‍याच पारंपरिक पद्धतीने अनेक ठिकाणी साजरा केला जातो. रायगडात होळीच्या माळरानावर काही ठिकाणी अजूनही पंधरा दिवस रोज पिलू होळी किंवा कोंबडहोळी पटवून होळीचा सण साजरा होतो.

शहर, गावोगावी रंगांची मुक्त उधळण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहाः जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी व मंगळवारी होळी व धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक प्रथा-परंपरांचे पालन करीत ग्रामस्थांनी होलिका दहन व धुळवड शांततेत साजरी केली.

डेटॉलने हातपाय धुतल्यास कोरोनाचे विषाणू मरतात..
 
कोकणात गणपती आणि होळी या दोन सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगडातही होळी सण तितक्‍याच पारंपरिक पद्धतीने अनेक ठिकाणी साजरा केला जातो. रायगडात होळीच्या माळरानावर काही ठिकाणी अजूनही पंधरा दिवस रोज पिलू होळी किंवा कोंबडहोळी पटवून होळीचा सण साजरा होतो. काही ठिकाणी हा सण आठवडा तर कुठे तीन दिवसांत उरकला जात आहे. समुद्रकिनाऱ्यांलगतच्या जिल्ह्यातील गावातही, कोळीवाड्यांतही होळी उत्साहात साजरी होते. पेण कोळीवाड्याची उंच होळी परिसरात चांगलीच परिचित आहे. केळी, सुपारी, आंबा, सावरीच्या होळ्या लावल्या गेल्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिचे पूजन करण्यात आले. पुरणपोळी, चामटी, फेण्या, करंज्या असे गोडधोड पदार्थ होळीला अर्पण करून पूजा करण्यात आली. पेटलेल्या होळीत नारळ अर्पण केले.
 
होळीचा दुसरा दिवस करीचा. पुरणपोळीचा गोडवा चाखल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिखटाचा बेत असतो. गावागावांत सार्वजनिकरीत्या बोकड कापून धुळवड साजरी करण्याची पद्धत आजही रूढ आहे. बोकड, मेंढा मोठ्या भांड्यात शिजवून हे शिजलेले मटण गावातील प्रत्येक घरात दिले जाते. याला होळीची पोस्त म्हणतात. शहरी भागात खवय्यांनी मटणाच्या दुकानाबाहेर सकाळपासून रांगा लावल्या होत्या. कोरोनाच्या भीतीने कोंबडीची दुकाने ग्राहकांविना सुनी सुनी होती. 

समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी 
हवीहवीशी धुळवड गावागावांत सकाळपासूनच सुरू झाली. रंगांच्या दुकानात रंग खरेदीसाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारे पर्यटकांबरोबरच स्थानिकांनीही फुलले होते. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड आदी किनाऱ्यांवर मुंबई, पुण्यातील पर्यटकांची संख्या मोठी होती. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुण्याहून आलेल्या पर्यटकांमुळे किनारे फुलले होते.