रायगड जिल्ह्यात गणेशमूर्तींवर महागाईचे सावट 

आकांक्षा देशमुख
रविवार, 4 ऑगस्ट 2019

घरी बनवलेल्या मूर्ती शाडू मातीच्या असतात, तर काही प्लास्टरच्या असतात. 600 पेक्षा अधिक गणेशमूर्ती बनवल्या जात आहेत. या मूर्तींची 500 पासून ते 6 हजारपर्यंत किंमत आहे.

मुंबई ः गणेशोत्सव महिन्यावर आला असून, जिल्ह्यात मूर्तिशाळांमध्येही कारागीरांची धांदल उडाली आहे. या वर्षी गणेशमूर्तींवर महागाईचे सावट असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक व्यवसाय सांभाळणाऱ्या मूर्तिकारांनाही वाढलेले रंग आणि मातीचे भाव, वाहतूक खर्च याचा ताळमेळ बसवताना कसरत करावी लागत आहे, असल्याचे चौक येथील मूर्तिकार सचिन श्रीधर गानू यांनी सांगितले. या वर्षी मूर्तीचे दर 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. 
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. त्यामुळे घराघरांत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. गावोगावी छोट्या-मोठ्या मूर्तिशाळा आहेत. सध्या या मूर्तिशाळांमध्ये कारागिरांची लगबग सुरू आहे. काही कारखान्यांमध्ये वर्षभर गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते, काही छोटे मूर्तिकार मे महिन्यानंतर मूर्तिकामाला सुरुवात करतात. जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे मूर्तिकार आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी ओळखले जातात. चौक येथील मूर्तिकार सचिन गानू हेही अशाच कामासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय ते करतात. सुरुवातीला लक्ष्मण कमलाकर गानू यांनी 1913 मध्ये गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा मुलगा कमलाकर गानू यांनी ही कळा जोपासली. आता त्यांच्या कुटुंबातील सचिन गानू यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांचा हा व्यवसाय वर्षभर चालतो. जून महिन्यात मूर्तीचे रंगकाम करण्यास सुरुवात केली जाते. काही मूर्ती घरी बनवल्या जातात तर काही पेण-हमरापूर विभागातून मागवल्या जातात. घरी बनवलेल्या मूर्ती शाडू मातीच्या असतात, तर काही प्लास्टरच्या असतात. 600 पेक्षा अधिक गणेशमूर्ती बनवल्या जात आहेत. या मूर्तींची 500 पासून ते 6 हजारपर्यंत किंमत आहे. या मूर्तिशाळेत चौकसह नवी मुंबई, पनवेल, कर्जत, खोपोली, लोणावळा येथून ग्राहक येतात. दर वर्षीच महागाईचा फटका आम्हा मूर्तिकारांना बसतो. तसा या वेळीही बसत आहे. सण महिन्यावर आल्याने काम वेळेत पूर्ण करण्यासाठी धांदल सुरू आहे. सध्या मजूरही मिळत नसल्याने वेळेत काम होण्यासाठी कारागीरांना दिवस-रात्र जागरण करावे लागत आहे. 

ग्राहकांच्या पसंतीच्या मूर्ती बनवून देतो. मूर्तीचा आकार, रंगकाम हे सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार असते. त्यामुळे दूरवरून गणेशमूर्ती नेण्यासाठी ग्राहक येतात. 
- सचिन श्रीधर गानू, 
मूर्तिकार, स्वामी गणेश कला केंद्र, चौक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue