कर्जतमध्ये उल्हास नदीला पूर 

हेमंत देशमुख
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शहरातील कोतवालनगरमधील विशाल अपार्टमेंटचा तळमजला अर्धा पाण्यात बुडाला. मुद्रे गवणी येथील तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. पालिका हद्दीतील आकुर्ले बामचा मळा हा भाग उल्हास नदी किनारी असल्याने या भागाला मोठा फटका बसला. पहाटे नागरिक झोपेत असतानाच घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. काही कळायच्या आत घर आणि परिसरात पाण्याची पातळी वाढून तीन फूट ते चार फूट पाणी साचले. 

मुंबई  ः रायगड जिल्ह्याती कर्जत शहराला आणि तालुक्‍याला दोन दिवस सलग सुरू असणाऱ्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. याचा फटका शहर तसेच तालुक्‍याला बसला आहे. घरांमध्ये पाणी शिरून सामानही वाहून गेले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांशी संपर्क तुटला आहे. आज पहाटेपासूनच वीजपुरवठा खंडित झाला आहे. कोलमडलेली रेल्वे सेवा यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

शहरातील कोतवालनगरमधील विशाल अपार्टमेंटचा तळमजला अर्धा पाण्यात बुडाला. मुद्रे गवणी येथील तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. पालिका हद्दीतील आकुर्ले बामचा मळा हा भाग उल्हास नदी किनारी असल्याने या भागाला मोठा फटका बसला. पहाटे नागरिक झोपेत असतानाच घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. काही कळायच्या आत घर आणि परिसरात पाण्याची पातळी वाढून तीन फूट ते चार फूट पाणी साचले.

नगरसेवक नितीन सावंत यांनी आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप स्थळी हलविले. तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी संबंधित तलाठ्यांना पाहणी पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तलाठी भूमिका लदगे यांनी पाहणी करून पंचनामा केला. तालुक्‍यातील गौरकामथकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचल्याने काही वेळासाठी रस्ता बंद झाला. नेरळ-दहिवली पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पूल पाण्याखाली गेला. शहरातील काही भागांतील डिपी पाण्यात गेल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण विभागाने पहाटेपासूनच वीजपुरवठा खंडित केला. बीएसएनएलची इंटरनेट सेवाही ठप्प झाली. सुदैवाने रविवार असल्याने चाकरमानी घरीच होते. बदलापूर रेल्वे रुळावर पाणी आल्याने आणि लोणावळा घाटात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळित झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue