वादग्रस्त घनकचरा प्रकल्पाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

दोन वर्षांपूर्वीही घनकचऱ्यापासून खतनिर्मितीच्या नवीन मशिनरीचे उद्‌घाटन केले होते; मात्र अजूनही कोणत्याही प्रकारचे खत तयार केले नाही, असा आरोप माजी सरपंच शिरीष मानकवळे यांनी केला. पालिकेने किती खतनिर्मिती केली. त्यापासून पालिकेला किती उत्पन्न मिळाले हे दाखवावे, असेही त्यांनी म्हटले.

मुंबई : आंबेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पेण पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला आंबेगाव ग्रामस्थांनी आक्षेप घेतलेला असताना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव ग्रामपंचायत हद्दीत पालिकेने पाच वर्षांपूर्वी घनकचरा प्रकल्प सुरू केला आहे. तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या घनकचरा प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले होते; मात्र सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी न्यायालयातही धाव घेतली आहे; मात्र ग्रामस्थांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करत पालिकेने येथे कचरा गोळा करणे सुरूच ठेवले आहे. दोन वर्षांपूर्वीही घनकचऱ्यापासून खतनिर्मितीच्या नवीन मशिनरीचे उद्‌घाटन केले होते; मात्र अजूनही कोणत्याही प्रकारचे खत तयार केले नाही, असा आरोप माजी सरपंच शिरीष मानकवळे यांनी केला. पालिकेने किती खतनिर्मिती केली. त्यापासून पालिकेला किती उत्पन्न मिळाले हे दाखवावे, असेही त्यांनी म्हटले.

प्रकल्प उभारल्यापासून दोन ते तीन वेळा उद्‌घाटन झाले आहे. अजून किती वेळा उद्‌घाटन होणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आंबेगाव येथील या घनकचरा प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. याबरोबरच पालिकेने म्हाडा कॉलनी येथे उभारलेल्या ‘थीम पार्क’चे उद्‌घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘क’ दर्जाच्या पालिकेत ‘थीम पार्क’ उभारणारी पालिका ही पहिलीच नगरपालिका आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue