दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

पाली-सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दारूबंदीचे निवेदन देताना आदिवासी महिला.
पाली-सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दारूबंदीचे निवेदन देताना आदिवासी महिला.

पाली : सुधागड तालुक्‍यातील चंदरगाव ग्रुप ग्रामपंचायत परिसरात अनेक वर्षांपासून बेकायदा गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दारूबंदीच्या मागणीसाठी चंदरगाव येथील आदिवासी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. २६) मोर्चा काढला. आदिवासी वाडीतील महिला, तरुण व ग्रामस्थांनी दारूच्या हातभट्ट्या उद्‌ध्वस्त करून संताप व्यक्त केला. त्यांनी पालीचे तहसीलदार व पोलिसांना दारूबंदीच्या मागणीचे निवेदनही दिले.

सुधागड या आदिवासीबहुल तालुक्‍यातील दुर्गम, डोंगराळ, जंगल भागात गावठी दारूची निर्मिती व विक्री केली जाते. चंदरगाव आदिवासी वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या लावल्या जातात. दारूच्या आहारी जाऊन अनेक जणांचा मृत्यू झाला आहे; परिणामी कित्येक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. म्हणून गावठी दारूचा कायमचा बंदोबस्त व्हावा, यासाठी चंदरगाव येथील आदिवासी महिला, शाळकरी मुले व ग्रामस्थांनी पोलिस स्थानक गाठले. त्यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना मागणीचे निवेदन सादर केले.

गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री बंद व्हावी, अशी मागणी आदिवासी सतत करत आहेत. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करून आदिवासींचे संसार उद्‌ध्वस्त करत आहे, असा आरोप नितीन वाघमारे यांनी केला. गॅस सिलिंडर वापरले नाहीत, तर धान्य देणार नाही, असे सांगणारे सरकार वनांची कत्तल करून गावठी दारू बनवणाऱ्यांवर कारवाई करेल का, असा सवाल त्यांनी केला. रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र शिंदे यांनी आदिवासींच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला. या मोर्चात महिला, मुले व वृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com